कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी अरूण गणपतराव डोंगळे यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. गोकुळ शिरंगाव एमआयडीसी येथील गोकुळच्या प्रधानकार्यालयात आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आली. निवडणूक निर्णयअधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या सविता लष्करे या उपस्थित होत्या. सभेच्या सुरूवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
अरूण डोंगळे यांनी आपल्या मनोगतामध्ये आमदार महादेवराव महाडिक व माजी आमदार पी.एन.पाटील यांनी माझ्यावर चेअरमनपदाची धुरा देऊन दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे ऋणी असलेचे सांगून माझ्या सहकारी संचालक मंडळाने मला आजपर्यंत दिलेल्या सहकाऱ्याबद्दल त्यांचे आभार मानले. पुढे बोलतांना डोंगळे म्हणाले,‘‘ गोकुळने दूध उत्पादकाकरिता राबविलेल्या विविध योजनांची माहिती देतांना ‘वासरू संगोपन योजना’, ‘गोकुळ आपल्या दारी’ यासारखे उपक्रम गोकुळने आपल्या कार्यक्षेत्रात प्रभावीपणे राबविल्यामुळे दुग्धव्यवसायात झालेला आमूलाग्र बदल याचाही त्यांनी उल्लेख केला. गोकुळचे आजचे संकलन जवळ जवळ ८ लाख ५० हजार लिटर्सपर्यंत पोचले असून गोकुळ लवकरच प्रतिदिन १० लाख लिटर्स दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.या प्रसंगी सर्व संचालक, संचालिका तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हिंदुराव चौगले, ज्येष्ठ कार्यकर्ते किशाबापू किरूळकर, उदय पाटील (कौलवकर), सदाशिव चरापले, विजयकुमार डोंगळे, भारत पाटील, बी.आर.पाटील (आवळीकर) आदी उपस्थित होते. शेवटी कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.