आर्णीसह तालुक्यात १८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असून अरुणावती धरण ओव्हर फ्लो झाल्याने ७ दरवाजे उघडण्यात आले असून आर्णीसह तालुक्यातील नदी-नाल्याकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १२ तासात २० मि.मी. पाऊस झाल्याने आतापर्यंत ६९० मि.मी. अशी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या संदर्भात तहसीलदार नरेंद्र दुबे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आर्णीसह नदी-नाल्याकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिल्याचे स्पष्ट केले. अरुणावती नदी तुडूंब भरून वाहत आहे.
अरुणावती नदीवरील धरणाचे ७ दरवाजे २० सें.मी.पर्यंत उघडण्यात आल्याने व पाऊस सुरूच राहिला तर अधिक पाणी सोडण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने आर्णीसह १५ गावांना पुरामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
पुराचा तडाखा बसणाऱ्या गावातील लोक मुठीत जीव घेऊन असून पाऊस सुरूच राहिला तर आर्णी शहरासाठी धोक्याची घंटी समजली जात आहे. त्यामुळे आर्णीसह नदी-नाल्याकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अरुणावती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता काटपल्लीवार धरणाच्या पातळीवर लक्ष ठेवून आहेत. पाच दरवाजे रात्री उघडण्यात करण्यात आले, तर दोन दरवाजे आज सकाळी ९ वाजता उघडण्यात आल्याला प्रकल्पाच्या सूत्राने दुजोरा दिला आहे.
तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
अकोला- यंदा पावसाने अगदी मृग नक्षत्रापासूनच सुरुवात केल्याने जिल्ह्य़ात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पावसाने सरासरी ओलांडली आहे. अद्याप आणखी दीड महिना पावसाळा बाकी आहे. एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्य़ात सर्वाधिक पाऊस तेल्हारा तालुक्यात झाला आहे. गेल्या २४ तासात तेथे २७ मि.मी पाऊस झाला असून आजपर्यंत ५३६.१० मि.मी. झाला आहे. जिल्ह्य़ातील धरणांपैकी वान धरणात सर्वाधिक साठा झालेलाोहे. टक्केवारी पुढीलप्रमाणे- काटेपूर्णा ६४, मोर्णा ३४, निर्गुणा ४१, उमा ५८, दगड पारवा २७ वान ८० टक्के भरले असल्याची माहिती आज देण्यात आली. काटेपूर्णा व वान धरण वगळता उर्वरित धरणातील साठी खूपच कमी आहे. सध्या पिकांना पोषक असा चांगला पाऊस झाल्याने सेतकरी आनंदित आहेत. जिल्ह्य़ात सोयाबीनचा पेरा मोठय़ा प्रमाणावर करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्य़ात २४ तासात विविध तालुक्यात झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे- अकोला १३.३, बार्शिटाकळी २१, अकोट २२, बाळापूर १७, पातूर २४, तर मुर्तिजापूर ३५ मि.मी.
अरुणावती ओव्हर फ्लो, आर्णीसह तालुक्याला सतर्कतेचा इशारा
आर्णीसह तालुक्यात १८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असून अरुणावती धरण ओव्हर फ्लो झाल्याने ७ दरवाजे उघडण्यात आले असून आर्णीसह तालुक्यातील नदी-नाल्याकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आणखी वाचा
First published on: 17-07-2013 at 10:01 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arunavati overflow alert in taluka