बॉलीवूड नामक स्वप्नांची नगरी भल्याभल्यांना आपल्याकडे खुणावता राहिली आहे. ग्लॅमरच्या या मायानगरीत आपले नाव, आपली ओळख निर्माण करण्याचे स्वप्न उराशी घेऊन अनेकजण येतात. पण, सगळ्यांनाच हे बॉलिवूडचे तिकीट लाभदायी ठरतेच असे नाही. पंजाबमधून आलेल्या सोनू सूद नामक एका उच्चशिक्षित तरूणाने इथे येऊन अभिनेता म्हणून नाव कमावण्याचे धाडस दाखवले. संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर सोनू आज एक उत्तम कलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाय रोवून उभा आहे. मणिरत्नम यांच्या ‘युवा’ चित्रपटात अभिषेकचा भाऊ म्हणून अगदी लहानशा भूमिकेत तो दिसला होता, आज सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, सलमान खानचा ‘दबंग’ अशा गाजलेल्या चित्रपटांतून त्याने काम केले आहे. दिग्दर्शक संजय गुप्ताच्या ‘शूट आऊट अॅट वडाला’ या चित्रपटात तो दाऊदची भूमिका करतोय तर प्रभुदेवा दिग्दर्शित ‘रमैय्या वस्तावैय्या’ या चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पंजाब ते बॉलीवूड व्हाया टॉलीवूड अशा या त्याच्या प्रवासाविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा..
‘शूट आऊट अॅट वडाला’ चित्रपटातील दाऊद ही तुझ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे, काय सांगशील या चित्रपटाविषयी..
दाऊद इब्राहिम कासकर याच्याबाबत लोक ऐकून आहेत. तरीही तो कसा घडला?
गुन्हेगारी क्षेत्रातील त्याचा वावर आजही सर्वसामान्यांसाठी कुतूहलाची गोष्ट आहे. त्यामुळे ही भूमिका मला फार महत्त्वाची वाटली. ‘डोंगरी ते दुबईर्’ या पुस्तकावर संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूटआऊट अॅट वडाला’ हा चित्रपट बेतला आहे. यात दाऊद मुळातच कसा तयार झाला, पठाण गँगबरोबर झालेला वाद आणि त्यानंतर त्याने संपूर्ण मुबंईची सूत्रे कशी हातात घेतली इथपासून ते तो दुबईला पळून जाण्याआधीपर्यंतचा कालावधी या चित्रपटात आहे. अर्थात, त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरणही नागपाडा, डोंगरी या भागात झाले आहे. मी स्वत: ते पुस्तक वाचले, त्या परिसरात फिरलो, माझे काही मित्र तिथे लहानाचे मोठे झाले त्यांच्याकडून मी अनेक गोष्टी समजावून घेतल्या आणखीही काही संदर्भाचा अभ्यास केला. त्यामुळे ही भूमिका माझ्यासाठी खरोखरच वेगळी आहे, फार अभ्यासपूर्वक ती मी साकारली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
याआधी अजय देवगणने दाऊदची भूमिका केली, आता अक्षय कुमारही त्या भूमिकेत दिसेल आणि आता तूही.. तुमच्यात तुलना तर होईलच ना..
याआधी दाऊद आणि अंडरवर्ल्डवर अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. तरीही त्याच्यावर चित्रपट येत आहेत आणि पुढेही येतील कारण मी म्हटले तसे तो विषयच लोकांसाठी कुतूहलाचा आहे. चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे, त्यामुळे त्याला त्या चित्रपटातून, भूमिकेतून काय मांडायचे आहे हे कधीही महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच कथा एकच असली तरी त्याच्यावर वेगवेगळे चित्रपट निघतात. तसेच याही चित्रपटाचे आहे. ‘शूट आऊट अॅट वडाला’ या चित्रपटात दिग्दर्शक संजय गुप्ताचा दाऊद तुम्हाला बघायला मिळेल. मी जो काही अभ्यास केला आहे आणि भूमिका साकारली आहे ती माझ्या दिग्दर्शकाच्या असलेल्या अपेक्षा लक्षात घेऊन साकारली आहे. त्यामुळे कथा, मांडणी आणि अभिनय अशा सगळ्याच बाबतीतला वेगळेपणा तुम्हाला अनुभवायला मिळेल. शिवाय, संजय गुप्ता स्वत: अंडरवर्ल्ड कथांवरचे चित्रपट बनवण्यासाठीच ओळखले जातात. त्यामुळे त्यांची शैली ही पूर्णत: वेगळी आहे. जे जे चांगले काम करतात त्यांची ओळख आपोआप निर्माण होते. त्यामुळे मला कुठल्याही तुलनेची वगैरे भीती वाटत नाही.
प्रभुदेवाच्या ‘रमैय्या वस्तावैय्या’ या चित्रपटाविषयी काय सांगशील?
‘रमैय्या वस्तावैय्या’ हाही तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे आणि अगदी पठडीतील मनोरंजनाचा मसाला ठासून भरलेला असा चित्रपट आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाभोवती ही कथा गुंफण्यात आली आहे. प्रभुदेवाबरोबर काम करण्याची एक वेगळीच मजा आहे. साध्यासुध्या कथेलाही मनोरंजनाचा तडका देऊन सुपरहिट चित्रपट बनवण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. मात्र, प्रभुदेवासाठी हा चित्रपट कायम लक्षात राहील.
पंजाबपासून बॉलीवूडपर्यंतचा प्रवास अवघड होता का..
खरोखरच कठीण आणि अगदी अशक्य वाटेल असाच होता. माझा जन्म पंजाबचा. मोगा हे माझे गाव. मी तिथे लहानाचा मोठा झालो, पुढे उच्च शिक्षणासाठी मी नागपूरला होतो. अभिनयाचे वेड लहानपणापासून होते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची पदवी हातात आल्यानंतरही मला बॉलीवूड जास्त जवळचे वाटत होते. अर्थात, त्यासाठी मुंबई गाठणेही आवश्यक होते, माझ्या पाठीमागे दोन लहान बहिणी होत्या पण, तरीही वडिलांनी मला कधी आडकाठी केली नाही. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एवढय़ा मोठय़ा इंडस्ट्रीत कोणाची ओळखपाळख नसताना काम मिळेल की नाही, हा प्रश्नही होताच. पण, मी प्रयत्न करत राहिलो. सुरूवातीपासून चांगल्याच चित्रपटातून काम करायचे मग भूमिका भले छोटी का असेना हे ठरवून टाकले होते. त्या पद्धतीने मनावर संयम ठेवून चित्रपट निवडत गेलो. आज त्या निर्णयाची आणि संयमाची गोड फळे मी चाखतो आहे.
‘दबंग २’ मध्ये तू का नाहीस?
सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ‘दबंग’ मध्ये छेदीसिंगची भूमिका फार महत्त्वाची होती. ‘दबंग २’ मध्ये छेदीसिंगच्या व्यक्तिरेखेला कुठेच वाव नव्हता. शेवटी निर्माता-दिग्दर्शक अरबाज खान, सलमान खान यांनी बसून चर्चा केली आणि परस्पर संमतीने छेदीसिंगला सीक्वेलपटातून बाहेर ठेवायचा निर्णय घेतला. मात्र, ‘दबंग ३’ चीही तयारी सुरू झाली असून त्यात छेदीसिंगशिवाय म्हणजेच माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
‘बुढ्ढा होगा तेरा बाप’ चित्रपटात तू अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केलंस, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
एखादा अभिनेता स्वतला तेव्हाच परिपूर्ण मानतो जेव्हा तो अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करतो. ते खूप कमालीचे आहेत. त्यांचा अभिनय, कामाची पद्धत, त्यांची एकंदरीत कामातली व्यावसायिकता इतरांपेक्षा खूप वेगळी आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांचे काम पाहिल्यानंतर एक अभिनेता म्हणून मला अजून बरीच मजल गाठायची आहे, याची जाणीव अधिक दृढ होते.
तुझा वीक-पॉईण्ट काय आहे, असं तुला वाटतं?
मी स्वत: पार्टी करत नाही, फिल्मी पाटर्य़ाना जात नाही. लोकांना हा माझा वीक-पॉईण्ट वाटतो. पण, मला माझा तो स्ट्राँग पॉईण्ट वाटतो. पार्टीत जाऊन काय करायचे हेच मला कळत नाही. उगाचच रात्री उशिरापर्यंत पार्टी करायची, सकाळी उशिरा उठायचे मग सेटवर उशिरा जायचं हेच मला पटत नाही. कामाच्या बाबतीत मी वक्तशीर आहे आणि मला असेच राहायला आवडते.