दोन संचालक कमी होणार
केंद्र सरकारने सहकारी संस्थांमध्ये आटोपशीरपणा आणण्यासाठी केलेल्या ९७व्या घटनादुरूस्तीनुसार शहर सहकारी बँकेने बँकेच्या घटनेत बदल करून त्याला विशेष सर्वसाधारण सभेत आज मंजुरी घेतली. विशेष सभा असूनही या सभेला अवघे दीड-दोनशे सदस्य उपस्थित होते.
गणपूर्तीअभावी सभा तहकूब करून नंतर पुन्हा थोडय़ा वेळाने आहे त्याच सदस्यांमध्ये ती घेण्यात आली. भा. मा. बांदल व अन्य एक दोन सदस्यांनी विचारलेल्या किरकोळ प्रश्नांनंतर फक्त १५ मिनिटांत सर्व बदलांना मंजुरी घेत सभा संपलीही. अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी सदस्यांना या घटनादुरूस्तीमुळे बँकेच्या घटनेत कायकाय दुरूस्त्या केल्या आहेत त्याची माहिती दिली. मुकुंद घैसास यांनी त्याबाबत विस्ताराने सांगितले. सभेला सर्व संचालक मंडळ व्यासपीठावर उपस्थित होते.
घैसास यांनी सांगितले की, केंद्र सरकारने घटनादुरूस्ती करून देशातील सर्वच सहकारी संस्थाना हे नियम लागू केले आहेत. हे सर्व बदल करणे अपरिहार्य आहे. केंद्राच्या सुचनेप्रमाणे १५ फेब्रुवारीच्या आधी हे बदल करण्यात येत आहेत. देशातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका यापुढे याच नियमाप्रमाणे होतील. शहर बँकेचे संचालक मंडळ यापुढे १७ सदस्यांचे न राहता १५ सदस्यांचे असेल, याशिवाय हिशोब तपासणाची नियुक्ती बँकेच्या सर्वसाधारण सभेत त्यात्या वर्षी केली जाईल. दहा वर्षांंच्या कालखंडात एका हिशोब तपासणीसाला दोन वेळा नियुक्त करता येणार नाही व हिशोबतपासणीस नेहमीच जिल्ह्य़ाबाहेरचा असेल ही दोन बंधने तर बँकेने स्वत:हून टाकली असल्याचे घैसास यांनी सांगितले. उपाध्यक्ष शिवाजी कदम यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा