आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेल्या बापूसमर्थक भक्तांनी दुपारी शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली. परिणामी पोलिसांनी बळाचा वापर करून जवळपास ५०० समर्थकांना अटक केली. यात महिलांची संख्या मोठी आहे. आसारामबापूंना चुकीच्या व खोटय़ा गुन्हय़ात अटक केली असून त्यांना सोडून द्यावे, अशी मागणी समर्थकांनी केली.
शहरात आसाराम बापूंचा मोठा भक्त परिवार आहे. अल्पवयीन मुलीच्या लंगिक शोषणप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आसाराम यांना अटक होताच सोमवारी त्यांच्या समर्थकांनी येथे साखळी उपोषण सुरू केले. अटकेच्या निषेधाच्या घोषणा देत समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, पोलिसांनी समर्थकांना रास्ता रोको व इतर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लावलेला शामियानाही पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यामुळे अचानक दुपारी बाराच्या सुमारास समर्थक थेट शिवाजी चौकात जमले. या वेळी घोषणाबाजी करत रस्ता अडवून धरला. आधीच वाहतुकीची गर्दी, त्यात रास्ता रोको यामुळे शहरातील प्रमुख रस्ते जाम झाले. पोलिसांनी बळाचा वापर करत समर्थकांना अटक केली. पाच गाडय़ांमधून या समर्थकांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
परभणीत ३११ जण ताब्यात
वार्ताहर, परभणी
आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना अटक केल्याच्या निषेधार्थ योग वेदान्त सेवा समिती व त्यांच्या भक्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केले. नवा मोंढा पोलिसांनी या वेळी १२३ महिला व १८८ पुरूष यांना ताब्यात घेऊन दुपारनंतर सोडून देण्यात आले.
प्रसारमाध्यमातून आसाराम बापूंवर बिनबुडाचे आरोप होत असल्याची टीका करून काही दिवसांपूर्वी परभणीत आसाराम बापूंच्या भक्तांनी मोर्चा काढला होता. सोमवारीही रास्ता रोको करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजू दायमा यांच्या नेतृत्वाखाली भक्तांनी बापू समर्थनार्थ घोषणा दिल्या. आसाराम बापूंवरील लंगिक शोषणाचा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी करीत रास्ता रोको सुरू केला. रस्त्यावर भक्तांनी ठाण मांडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. नवा मोंढा पोलीस ठाण्याचे अधिकारी तानाजी दराडे, चव्हाण यांनी ३११जणांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये ठाण्यात नेले. दोन तासांनंतर या भक्तांना सोडून दिले.
औरंगाबादेत ७०० समर्थक ताब्यात
प्रतिनिधी, औरंगाबाद
बलात्काराच्या आरोपात अटकेत असणाऱ्या आसाराम बापूंच्या समर्थनार्थ सोमवारी क्रांती चौकात त्यांच्या समर्थकांनी निदर्शने केली. आसाराम बापू यांना नाहक गोवण्यात आले आहे. त्यांची सुटका करावी, अशी मागणी या वेळी कार्यकर्त्यांनी केली. सकाळी ११ वाजता क्रांती चौकात बापू समर्थक मोठय़ा संख्येने जमले होते. त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. समर्थकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी मुख्यालयात नेले. तेथील सभागृहातही समर्थकांनी घोषणाबाजी केली.

Story img Loader