नाटककार मोहन राकेश यांच्या ‘आषाढ का एक दिन’ या नाटकाची गणना भारतीय रंगभूमीवरील मोजक्या अभिजात नाटकांमध्ये केली जाते. कवी कालिदास आणि त्याची प्रियतमा मल्लिका यांच्या आयुष्यावर आधारीत या नाटकात मानवी जीवनातील उत्कट.. तरल क्षण आणि आदर्श मानवी मूल्यं जशी प्रत्ययाला येतात तसंच दाहक अन् कटु वास्तवाचंही प्रत्ययकारी दर्शन घडतं. वरकरणी वास्तववादी वाटणारं हे नाटक त्याच्या शैलीदार रचनेमुळे काहीसं पुस्तकी, बिनवास्तववादीही ठरतं. त्यात प्रतिबिंबित झालेली मानवी जीवनातील व्यामिश्रता, गुंतागुंत आणि उद्ध्वस्त करणारी भीषण वास्तवता प्रेक्षकाचं मन विकल करते. निरनिराळ्या प्रांतीय भाषांमध्ये या नाटकाचं भाषांतर झालेलं आहे. आणि संवेदनशील रंगकर्मीना हे नाटक कायम आकर्षित करीत आलेलं आहे. ज्योती सुभाष भाषांतरित आणि अतुल पेठे दिग्दर्शित ‘आषाढातील एक दिवस’ हे ‘नाटकघर’ आणि ‘श्री सिद्धिविनायक’ निर्मित नाटक अलीकडेच व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. आशयसंपन्नतेत आघाडीवर असणाऱ्या मराठी रंगभूमीवर अपवादानंच आढळणारं ‘दृक्-श्राव्य-काव्य’ या प्रयोगात अनुभवायला मिळतं, हे या प्रयोगाचं आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्टय़!
एका गावंढय़ा गावात जन्माला आलेल्या कवी कालिदासाच्या प्रतिभेची कीर्ती सर्वदूर पोहोचण्याची, त्याच्या योग्यतेनुरूप त्याला मानसन्मान मिळण्याची शक्यता तशी धूसरच. उलट, कवी म्हणून असलेलं त्याचं मोठेपण इथल्या सर्वसामान्य लोकांना कळणं अशक्यच. तथापि नितांतसुंदर निसर्गानं समृद्ध, अनाघ्रात जीवनमूल्यं जोपासणाऱ्या या गावात कालिदासाच्या प्रतिभेला नवनवोन्मेषी धुमारे फुटतात. त्याची स्फूर्तीदेवता आणि प्रेयसी मल्लिका हिच्या सान्निध्यात त्याची प्रतिभा अधिकच बहरते. उज्जयिनीच्या सम्राट चंद्रगुप्ताच्या कानी त्याची कीर्ती पोहोचते. तो त्याला राजकवी म्हणून दरबारी आमंत्रित करतो. परंतु आपलं गाव, इथला निसर्ग आणि मल्लिकाला सोडून जाणं कालिदासाला नको वाटतं. राजकवी म्हणून आपला उत्कर्ष होईलही कदाचित; परंतु या भूमीत रुजलेली आपली मूळं हरवतील, तीत बहरणारी आपली काव्यप्रतिभा हरपेल अशी भीती त्याला वाटते. म्हणून तो या निमंत्रणास नकार देतो. परंतु मल्लिकाला त्याला कवी म्हणून मोठं झालेलं पाहायचं असतं. त्यासाठी त्यानं हे गाव सोडायला हवं, ही संधी घ्यायला हवी असं तिला मनापासून वाटतं. आपल्या प्रेमपाशात अडकून कालिदासानं ही संधी गमावता कामा नये. ती बऱ्याच प्रयत्नांती कालिदासाला उज्जयिनीला जाण्यासाठी राजी करते.
कालिदास उज्जयिनीला जाऊन राजकवीपद स्वीकारतो. यथावकाश राजकन्या प्रियंगुमंजिरीशी त्याचा विवाह होतो. त्याला काश्मीरचे राजेपद दिलं जातं. यादरम्यान त्यानं केलेल्या रचनांमुळे कवी म्हणूनही त्याची कीर्ती सर्वदूर पसरते.  
इकडे मल्लिका मात्र त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. त्याची सर्वदूर पसरलेली कीर्ती तिला सुखावते. त्याच्या सगळ्या काव्यरचना ती महत्प्रयासानं मिळवते आणि त्यांच्या चिंतन-मननात ती दंग राहते. तिची इच्छा फलद्रुप झालेली असते. ‘कालिदास मोठा झाला’ या समाधानात ती आयुष्य कंठत राहते.
पण आयुष्य इतकं साधं-सरळ नसतंच कधी. कटु वास्तव तिची कठोर परीक्षा पाहतं. आई अंबिकेच्या पश्चात तिला जगणं असह्य़ होतं. वारांगणेचं आयुष्य तिच्या वाटय़ाला येतं. ज्या विलोमचा ती सतत तिरस्कार करीत आलेली असते त्याचीच अर्धागिनी बनून त्याच्या मुलाची आई होण्याचं तिच्या नशिबी येतं. मनानं कालिदासाशी एकरूप झालेली; परंतु तनानं भ्रष्ट झालेली मल्लिका तरीही आयुष्यभर कालिदासावर जीवापाड प्रेम करीत राहते. काश्मीरला जाताना एकदा कालिदास गावातून जातो, परंतु मल्लिकेला भेटत नाही. त्याची पत्नी प्रियंगुमंजिरी मात्र मुद्दाम मल्लिकेची भेट घेते. तिला आपली दासी म्हणून सोबत नेण्याची इच्छा व्यक्त करते. आपल्या सेवकाशी मल्लिकेचं लग्न लावून देण्याची ग्वाही देते. परंतु मल्लिका तिच्या या विनंतीला ठाम नकार देते. किमान तिचं पडकं घर पाडून त्या जागी नवं घर बांधून देण्याचं आणि तिच्या उदरनिर्वाहाची कायमची सोय करण्याचं आश्वासन प्रियंगुमंजिरी तिला देते. त्यासही मल्लिका नकार देते. शेवटी निरुपाय होऊन प्रियंगुमंजिरी निघून जाते.
..आयुष्य पुढं सरकत राहतं. काही वर्षांनी कालिदास राजवैभव आणि सत्तेच्या राजकारणाला विटून काश्मीरमधून परागंदा होतो. आपली हरवलेली मूळं शोधत, वाट फुटेल तिथं भरकटत अखेरीस आपल्या गावात परत येतो. भणंग, भग्नावस्थेतील कालिदास मल्लिकेची भेट घेतो. आपण पुन्हा नव्यानं आयुष्याला सुरुवात करूया म्हणतो. पण आता खूप उशीर झालेला असतो. इत:पर मल्लिकेच्या आयुष्याची धुळधाण झालेली असते. नव्यानं आयुष्याला सामोरं जायची तिची उमेद विझलेली असते. तिच्या त्या विषण्ण रूपात समोर उभं ठाकलेलं दाहक, कटु वास्तव पाहून कालिदास हादरतो. सर्वस्व हरवलेला कालिदास तिच्या घरातून बाहेर पडतो.
वरवर पाहता ही कालिदास-मल्लिकेची अधुरी प्रेमकहाणी असल्याचा भास होत असला तरी ती तेवढय़ाचपुरती सीमित नाही. या कहाणीत मल्लिकेची आई अंबिका आहे- जिला कठोर वास्तवाचं तीव्र भान आहे. ती मल्लिकेला सावध करण्याचा खूप प्रयत्न करते. कालिदास आत्मकेंद्री आहे, तो तुला सुखी करू शकणार नाही, हे ती परोपरीनं तिच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करते. पण मल्लिका तिचं काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नसते. शेवटी अंबिकेनं वर्तवलेलं भविष्यच खरं ठरतं. अयशस्वी कवी विलोमही असाच! मल्लिकेवर त्याचं एकतर्फी प्रेम असतं. ती मात्र त्याचा दु:स्वास करते. पुढे नियतीच सूड उगवावा तशी मल्लिकेला विलोमची पत्नी बनायला लावून त्याच्या मुलाची माता होण्यास भाग पाडते. कालिदासाचा मामा मातुल हाही भाच्याच्या राजवैभवात स्वत:ला वाटेकरी समजतो. परंतु त्या वैभवाचे काटे बोचल्यावर त्याला वास्तवाचं भान येतं. अशी छोटी छोटी पात्रंही नाटकात आहेत. त्यांचं त्यांचं म्हणून एक स्थान नाटकात आहे. मानवी जीवनाचा रंगीबेरंगी कॅलिडोस्कोप दाखविण्यासाठी लेखक मोहन राकेश यांनी त्यांची योजना केली आहे. ही सारी हाडामांसाची माणसं आहेत. त्यांचे गुणदोष, त्यांचं भागधेय त्यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर आणून उभं करतं. प्राप्त प्राक्तन स्वीकारण्यावाचून मनुष्याच्या हाती काही नसतं, हे कठोर वास्तव अत्यंत तरलतेनं, परंतु तितक्याच रोखठोकपणे मोहन राकेश यांनी ‘आषाढातील एक दिवस’मध्ये मांडलेलं आहे.
ज्योती सुभाष यांनी अत्यंत जाणकारीनं या नाटकाचं भाषांतर केलेलं आहे. त्यांनी मूळ नाटकातले भावभावनांचे सूक्ष्म आंदोळ नजाकतीनं भाषांतरात उतरविले आहेत. दिग्दर्शक अतुल पेठे यांनीही या अभिजात नाटकाची पिंडप्रकृती खोलात समजून घेत ते बसवलं आहे. नाटकातला प्राचीन काळ, त्यावेळची माणसं, त्यांचा परिवेष, त्याकाळची अनाघ्रात जीवनपद्धती हे सारं वास्तव स्वरूपात नाटकात येईल याची एकीकडे खातरजमा करत असतानाच मूलत: मानवी मूल्यं सर्वच काळांत सारखीच असतात, हे त्रिकालाबाधित सत्यही त्यांनी या प्रयोगात उन्मेखून अधोरेखित केलं आहे. ठाय लयीत त्यांनी या तीन अंकी नाटकाची बांधणी केली आहे. त्यास अनुसरून कलावंतांची कामं, संगीताचा पोत आणि नाटकातील दृश्यात्मकताही आखीवरेखीवपणे त्यांनी आकारली आहे. पात्रानुरूप त्यांचं व्यक्त होणं बदलत जातं. नाटकातले तरल अन् उत्कट भावुक प्रसंग नाजूकतेनं हाताळताना कटु वास्तव मांडणारे प्रसंगही तितक्याच करकरीतपणे पेठे यांनी मंचित केले आहेत, हे विशेष. तथापि प्रियंगुमंजिरीच्या सेवकांचा मल्लिकेच्या घरी येण्याचा प्रसंग मुद्दाम रंजक केलेला आणि काहीसा हिशेबी वाटतो. कलावंतांच्या संवादोच्चारांवर त्यांनी विशेष काम केल्याचं जाणवतं. काही पुस्तकी शैलीतले संवाद त्यांनी प्रेक्षकांना अवास्तव वाटणार नाहीत याची उचित काळजी घेतली आहे. दृश्य-काव्य-श्राव्य या तिन्हींचा मनोहारी संगम प्रयोगात पाहायला मिळतो. यातले काही दृश्य आकृतिबंध रतन थिय्याम यांच्या मणिपुरी नाटय़शैलीची आठवण करून देतात. प्रदीप वैद्य यांनी प्रकाशयोजनेतील सौंदर्य आणि मानवी भावभावनांचं अद्वैत उत्तमरीत्या साधलं आहे. तीच गोष्ट नरेंद्र भिडे यांच्या संगीताची. त्यांनी केलेला रागसंगीताचा चपखल वापर आणि त्याचं भावस्पर्शी उपयोजन नाटकाच्या निर्मितीमूल्यांत भर घालतं. श्याम भुतकर यांनी कालनिदर्शक नेपथ्य साकारतानाच तत्कालीन वेशभूषेचाही नेत्रसुखद प्रत्यय दिला आहे. पात्रांची केशभूषाही प्राचीन नाटकांत महत्त्वाची ठरते. कविता कोपरकर यांनी तिला योग्य न्याय दिला आहे. पर्ण पेठे यांनी साकारलेली सुरुवातीची अथांग आभाळासारखी निर्भर, अवखळ, अल्लड यौवना आणि पुढे आयुष्याचे टक्केटोणपे खाऊन विकल, असहाय झालेली स्त्री- तिच्या वेगवेगळ्या भावच्छटांसह उत्कटपणे साकारली आहे. मल्लिका : एक अविरत प्रेमिका आणि मल्लिका : एक जीवनानुभवांनी जड झालेली स्त्री (जरी बाह्य़ांगी ती तशी दिसत नसली, तरीही!)- या दोन रूपांमध्ये पर्ण पेठे यांनी अभिनयाची जी खोल समज दाखविली आहे, ती थक्क करणारी आहे.
अभिनेत्री म्हणून त्या दिवसेंदिवस अधिकाधिक परिपक्व होत चालल्याचा सुखद प्रत्यय त्यातून येतो. यापूर्वी ‘सत्यशोधक’मध्ये त्यांनी साकारलेली सावित्रीबाई फुले ही पूर्णत: वेगळी, आव्हानात्मक भूमिका होती. आलोक राजवाडे यांनी आत्ममग्न कवी कालिदास उत्तम उभा केला आहे. उत्तरार्धातील कालिदासाची विकलावस्था मात्र त्यांना तितक्या तरलतेनं साध्य झाली नाही. ओम भुतकर यांनी विलोमचं किंचितसं खलनायकी, ठाशीव रूप मुद्राभिनय आणि संवादफेकीतून समूर्त केलं आहे. सततच्या अपयशातून येणारी बोचरी वाणी त्यांनी अचूक टिपली आहे. ज्योती सुभाष यांनी मल्लिकेच्या काळजीनं अंबिकेचा होणारा व्यक्त-अव्यक्त आक्रोश संवाद आणि विरामाच्या जागांतून सहजगत्या पोहोचवला आहे. मातुलचं लोभी, लालची रूप आणि त्याची उत्तरायुष्यातील हताशा गजानन परांजपे यांनी सर्वागांतून व्यक्त केली आहे. केतकी विलास यांनी राजकन्या प्रियंगुमंजिरीचा दिमाख आणि डौल खासाच दाखविला आहे. अन्य कलाकारांनीही आपली कामं चोख बजावली आहेत. दृक्-श्राव्य-काव्यानुभव देणारं हे नाटक एकदा तरी ‘याचि डोळा’ अनुभवावं असं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा