माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव टोपे यांच्याशी शुक्रवारी केलेली चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे लोकसभेसाठी जालना मतदारसंघातून डोंगरे व टोपे हे दोघेही इच्छुक आहेत.
माजी मुख्यमंत्री चव्हाण शुक्रवारी सकाळी औरंगाबादहून नांदेडकडे जाताना थोडा वेळ जालना येथे थांबले होते. त्यांनी डोंगरे व टोपे यांच्या निवासस्थानी भेट दिली. चव्हाण यांची ही भेट पूर्वनियोजित किंवा राजकीय कारणांसाठी नव्हती. परंतु डोंगरे व टोपे हे दोघेही लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने यासंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये चर्चा मात्र सुरू झाली. डोंगरे यांच्या निवासस्थानी चव्हाण यांनी चहापान घेतले. आमदार कैलास गोरंटय़ाल, अंबडचे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुळकर्णी व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरविंद चव्हाण यांची या वेळी उपस्थिती होती. यानंतर चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीसंदर्भात डोंगरे यांनी सांगितले, की जालनामार्गे नांदेडला जाताना चव्हाण शहरात शासकीय विश्रामगृहावर थांबणार होते. तेथून जवळच आपले घर आहे, म्हणून ते चहापानासाठी आपल्या निवासस्थानी आले. ही भेट पूर्वनियोजित व राजकीय स्वरूपाची नव्हती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते टोपे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास चव्हाण त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्या वेळी आपणही उपस्थित होतो आणि तेथेही कोणतीही राजकीय चर्चा होण्याचा प्रश्नच नव्हता.
आघाडीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे असून या वेळेस उमेदवारीसाठी डोंगरे इच्छुक आहे. हा मतदारसंघ काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीस सोडावा, अशी मागणी टोपे यांनी पूर्वीच केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उद्या (शनिवारी) जालना जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याआधी अशोक चव्हाण यांनी डोंगरे व टोपे यांच्या निवासस्थानी दिलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. डोंगरे यांच्या निवासस्थानी चव्हाण यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस चव्हाण यांचेही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आले. त्यामुळेच चव्हाण यांची अल्पकाळाची जालना भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Story img Loader