मराठवाडय़ाच्या विकासासाठी चव्हाण व देशमुख कुटुंबीयांचे मोठे योगदान आहे. या भागाचा भौगोलिक विकास पाहता औरंगाबाद महसूल विभागाचे विभाजन करून नांदेड व लातूर येथे स्वतंत्र महसूल आयुक्तालय स्थापन करणे हीच विलासरावांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आमदार अमर राजूरकर यांनी केले.
जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित अभिवादन सोहळय़ात ते बोलत होते. देशमुख व चव्हाण कुटुंबीयांनी एकत्र येऊन मराठवाडय़ाचा मोठा विकास केला. यापुढे मराठवाडय़ाला विकासाची गती देण्याची नितांत गरज आहे. अलीकडच्या काळात नेतृत्वाअभावी हा भाग विकासापासून दूर चालला आहे. अशोक चव्हाण यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा राजूरकर यांनी व्यक्त केली.
आपल्या अखेरच्या दौऱ्यात विलासराव देशमुख नांदेडला आले असताना त्यांची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी बंद खोलीत चर्चा झाली. या बठकीदरम्यान दोघांनीही लातूर व नांदेडसाठी स्वतंत्र महसूल आयुक्तालय स्थापन करावे, असा प्रस्ताव मान्य केला होता. शिवाय असा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला. विलासरावांना श्रद्धांजली म्हणून हा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राजूरकर यांनी व्यक्त केली. पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सूत्रसंचालन केले.

Story img Loader