काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वेगवेगळ्या जाहीर सभांच्या माध्यमातून ग्रामीण मतदारांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम आखला आहे. शनिवारी (दि. १५) त्यांची ही प्रचार मोहीम सुरू होत आहे. दरम्यान, शनिवारी सर्व सभांना वेळेत पोहोचता यावे, यासाठी चव्हाण यांनी हेलिकॉप्टर मागविले असल्याचे सांगण्यात आले. दोन वर्षांपूर्वी जि. प. निवडणुकीच्या प्रचारात चव्हाण यांनी हेलिकॉप्टरचा वापर करून अनेक सभा घेतल्या होत्या.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने गेल्या महिन्याच्या शेवटी नांदेडला भव्य मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. मेळाव्यास १० हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर अर्धापूरलाही मोठा मेळावा झाल्यानंतर चव्हाण यांनी सोमवारच्या वास्तव्यात पुढचे नियोजन निश्चित केले. त्यानुसार शनिवारी त्यांच्या ३ सभा निश्चित झाल्या आहेत. पहिली सभा करुळा (तालुका कंधार), तर दुसरी सभा सावळी येथे होईल. दोन्ही सभा मुखेड मतदारसंघात होत असल्याने संपूर्ण नियोजन जि. प. अध्यक्ष दिलीप बेटमोगरेकर यांच्याकडे सोपविले आहे. या दोन सभांनंतर देगलूरला होणाऱ्या सभेची जबाबदारी आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्यावर सोपविली आहे. चव्हाण यांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या बैठकीस पालकमंत्री डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, संबंधित आमदार, महापौर, उपमहापौर आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा १ मार्चला होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी आचारसंहिता लागणार आहे. तत्पूर्वी ग्रामीण भागात जाहीर सभांच्या माध्यमातून किमान ४ लाख लोकांसमोर काँग्रेसची भूमिका मांडता यावी, त्यांच्याशी संवाद साधता यावा, अशा पद्धतीने चव्हाण यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पोकर्णा यांच्या मतदारसंघात सोनखेडला एक सभा निश्चित झाली आहे. पुढच्या टप्प्यात नायगाव, बिलोली आणि भोकर मतदारसंघात चव्हाण यांच्या काही सभा होतील. खासदार भास्करराव खतगावकर, पालकमंत्री डी. पी. सावंत हेही सभांना उपस्थित राहणार आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघात जि. प. चे ३६ गट आहेत. दोन गटांमध्ये एक अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.