अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी, माजी महापौर संदीप कोतकरसह त्याचे बंधू सचिन व अमोल कोतकर या तिघांनी जिल्हाबंदी शिथील करावी या मागणीसाठी केलेला अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे या तिघांची जिल्हाबंदी कायम राहिली आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश आशुतोष करमरकर यांनी हा आदेश दिला. याचबरोबर आणखी एक आरोपी राजेश ढवण याचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील व आरोपींच्या वतीने वकील सतीश उदास, सतीशचंद्र सुद्रिक व महेश तवले यांनी काम पाहिले. याच प्रकरणात मागील महिन्यात न्यायालयाने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या जिल्हाबंदीचा आदेश मागे घेतला. प्रमुख आरोपी भानुदास कोतकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
तिघाही कोतकर बंधूंना न्यायालयाने जामीन मंजूर करताना दि. १३ एप्रिल रोजी जिल्हाबंदीचा व ज्या ठिकाणी वास्तव्य असेल त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला दर सोमवारी हजेरी लावण्याचे बंधन टाकले होते, हे बंधन शिथील करावे असा विनंती अर्ज तिघांनीही दि. ८ ऑक्टोबरला सादर केला होता. बाहेर जिल्ह्य़ात राहिल्याने नगरमधील व्यवसाय पाहता येत नाहीत, त्यामुळे नुकसान होते, वैद्यकीय उपचारासाठी नगरमध्ये यावे लागते, न्यायालयाने याच प्रकरणात आ. कर्डिले यांच्या अटी शिथील केल्या आहेत, असा युक्तिवाद वकिलांनी केला होता. जिल्हा सरकारी वकील पाटील यांनी त्यास जोरदार विरोध केला, तसेच मूळ फिर्यादी शंकरराव राऊत यांनीही अटी शिथिल करण्यास विरोध करणारा अर्ज सादर केला होता. 

Story img Loader