अशोक सहकारी साखर कारखान्याचे सभासद तसेच ऊस उत्पादकांना आता सर्व माहिती दूरध्वनी व मोबाइलद्वारे मिळणार आहे. अशाप्रकारची सेवा उपलब्ध करणारा अशोक हा जिल्ह्यातील पहिलाच साखर कारखाना असल्याची अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी माहिती दिली.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या संकल्पनेनुसार संगणकीकरण करण्यात आले आहे. ईआरपी प्रणालीद्वारे शेतक-यांना चालू गळीत हंगामापासून उसाची नोंद, उसाचे वजन, ऊसबिल, ठेव व शेअर्स याची माहिती दूरध्वनी व मोबाइलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. माहितीच्या उपलब्धतेसाठी शेतक-यांस आपला दूरध्वनी किंवा मोबाइलची नोंद करावी लागेल. नोंदणीकृत क्रमांकावर फक्त स्वत:चीच माहिती दिली जाईल. इतरांची माहिती मिळणार नाही असे गलांडे यांनी सांगितले.
आपल्या दूरध्वनीवरून किंवा मोबाइलवरून ०२४२२-२४६२९९ या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ऊस वजनासाठी १, मागील पंधरवडा वजनासाठी २, चालू पंधरवडा वजनासाठी ३, मागील बिलासाठी ४, चालू गळीत हंगाम ऊसनोंदीसाठी ५, पुढील गळीत हंगाम नोंदीसाठी ६, ठेवीसाठी ७, शेअरच्या माहितीसाठी ८ याप्रमाणे क्रमांक दाबल्यानंतर आवाजी संदेशाद्वारे माहिती मिळेल. लिखित संदेशासाठी ८९७५००६९९९ या क्रमांकावर संपर्क करून ऊसनोंदीसाठी एफ पीएल, ऊसवजनासाठी एफडब्ल्यूटी, तर बिलाच्या माहितीसाठी एफबीटी, टाइप करून मेसेज पाठविल्यानंतर माहितीचा लिखित संदेश प्राप्त होईल. या सेवेमुळे शेतक-यांना आता कारखान्यावर हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे गलांडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा