मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सोबत नसले, तरी राज्यात महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा करतानाच शिवसेना-भाजपने रिपब्लिकन पक्षाला लोकसभेच्या तीन जागा व राज्यसभेची एक जागा द्यावी, अशी मागणी ‘रिपाइं’चे नेते रामदास आठवले यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. ही मागणी करतानाच २६ जानेवारीपर्यंतची मुदत त्यांनी दिली. विधानसभेच्या ३० जागा सोडण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सासवड येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आपण एकत्र होतो. तेथे राजकीय चर्चेचे काही कारण नव्हते. त्यामुळे तेथे राजकारणाशी संबंधित विषयावर बोललो नाही, असेही ते म्हणाले.
पुढचा पंतप्रधान ‘एनडीए’चाच होणार आहे. फारच गरज पडली, तर त्यावेळी शरद पवार यांच्याशी बोलता येऊ शकेल. देशभर काँग्रेसविरोधी लाट आहे. आम आदमी पार्टीस दिल्ली विधानसभेत यश मिळाले असले, तरी महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडणार नाही. ‘आदर्श’ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशनच याच महिन्यात घ्यावे, अशी मागणीही आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याचे प्रयत्न आपण यापूर्वीच केले आहेत. असे ऐक्य होत नाही, यास नेते व कार्यकर्ते या दोघांनाही जबाबदार धरले पाहिजे. एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे कायम अध्यक्षपद प्रकाश आंबेडकर यांना देण्याची तयारी आपण पूर्वीच दाखविली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मातोश्री रमाबाई आंबेडकर घरकूल योजनेसाठी बीड जिल्ह्य़ात आलेले सरकारचे ८६ कोटी रुपये जागा मिळाली नसल्याने परत केले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्य़ांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचेही आठवले म्हणाले. ‘रिपाइं’चे मराठवाडा अध्यक्ष अॅड. ब्रह्मानंद चव्हाण या वेळी उपस्थित होते.

Story img Loader