पुणे शहराचा समतोल विकास या नावाखाली स्थायी समितीच्या अंदाजपत्रकात फक्त कोथरूड विधानसभा मतदारसंघातच भरघोस तरतुदी करण्यात आल्यामुळे समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभेची आगामी निवडणूक सन २०१४ मध्ये होत असल्यामुळे महापालिकेच्या सन १३-१४ च्या अंदाजपत्रकात निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच भरघोस तरतुदी करण्यात आल्याचे दिसत आहे. समितीचे अध्यक्ष चांदेरे यांनी कोथरूड, बाणेर, बालेवाडी या भागांमध्ये मोठे प्रकल्प अंदाजपत्रकात प्रस्तावित केले असून त्यासाठी ६० कोटींची तरतूद केली आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या २८ गावांसाठी अंदाजपत्रकात ५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर कोथरूड मतदारसंघातील रस्त्यांसाठी तब्बल २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कोथरूड परिसराच्या विकासासाठी या नावाखाली ही तरतूद करण्यात आल्याचे अंदाजपत्रकात म्हटले आहे.
याशिवाय शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून अंदाजपत्रकात अनेक ग्रेड सेपरेटर प्रस्तावित करण्यात आले आहेत आणि ते बाणेर, बालेवाडी, सोमेश्वरवाडी आणि बाणेर फाटा येथील आहेत. याशिवाय गणेशखिंड येथे भुयारी मार्ग, कोथरूड पोलीस स्टेशन येथे भुयारी मार्ग, पौड रस्त्यावर भुयारी मार्ग, कर्वे रस्ता, करिष्मा चौक येथे भुयारी मार्ग, कर्वे पुतळा चौकात भुयारी मार्ग अशा या कामांसाठी २६ कोटी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय बाणेर येथील ई-लर्निग स्कूलसाठी चार कोटी रुपये देण्यात आले आहेत. बाणेर येथे नवीन क्षेत्रीय कार्यालयासाठी दीड कोटी, बालेवाडी स्टेडियमजवळ पाण्याच्या टाकीसाठी चार कोटी, बाणेर भागातील जलवाहिनीसाठी एक कोटी, वारजे येथील नाटय़गृहासाठी चार कोटींची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली
आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा