नेवासे तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विलास पाटील यांना अखेर आज निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी ही कारवाई केली.
अकरा महिन्यांपर्वी पाटील येथे रुजू झाले. मात्र या काळात पोलीस ठाण्यात सावळा गोंधळच होता. अपूर्ण तपास, दैनंदिनी न लिहिणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, वाढलेले अवैध धंदे यासह नागरिकांच्या तक्रारी आदी गोष्टी लक्षात घेऊन अखेर आज पाटील यांना निलंबित करण्यात आले. तीन दिवसांपूर्वीच त्यांना याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. दि. १० ला झालेल्या बैठकीतही त्यांच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत शिंदे यांनी त्यांना जाहीररीत्या खडसावले होते असे समजते.
पाटील यांची खातेनिहाय चौकशीही सुरू होती. शेवगाव विभागाचे उपाधीक्षक गणेश राठोड जेवर असल्याने कर्जत विभागाचे उपाधीक्षक तुषार पाटील यांनी त्यांची खातेनिहाय चौकशी केली. चौकशीचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आज दुपारीच त्यांचा पदभार उपनिरीक्षक खंडेराव रंजवे यांच्याकडे सोपवण्यात आला.