आकाशात काय घडतंय.. अवकाश दर्शन करण्याच्या पद्धती.. अवकाशातील भविष्यातील घडामोडी आदी गोष्टींची इत्थंभूत माहिती आता आपल्याला मराठीत उपलब्ध होणार आहे. यासाठी खगोल मंडळाने पुढाकार घेतला असून त्यांनी ‘खगोल वृत्त’ नावाने ई-नियतकालिक प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.
खगोलविषयक जागृती आणि ज्ञानप्रसाराचे काम खगोल मंडळ गेली तीन दशके करीत आहे. या मंडळाने अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यासाठी ‘खगोल वार्ता’ आणि ‘वैश्विक’ ही नियतकालिकेही प्रसिद्ध केली जातात. पण सध्याच्या ई-जमान्यात छापील अंकांपेक्षा ई-अंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि वाचकांच्या दृष्टीनेही ते सोयीचे असल्याने मंडळाने नुकतेच ‘खगोल वृत्त’ नावाने ई-मासिक सुरू केल्याचे मासिकाचे संपादक डॉ. अनिकेत सुळे यांनी स्पष्ट केले.
या अंकाच्या माध्यमातून खगोल मंडळातील सदस्य तसेच इतर खगोलविषयक अभ्यास करणारी कोणतीही व्यक्ती आपले अनुभवही वाचकांना सांगू शकते. यात खगोलीय छायाचित्रे, आकश निरीक्षणाचे अनुभव आदी गोष्टींची माहिती असणार आहे. या अंकात खगोलविषयक लेख, आकाशदर्शनाचे कार्यक्रम, खगोलशास्त्रीय अभ्यासवर्ग यांची माहितीही देण्यात येणार आहे. याशिवाय महिनाभरात अवकाशात कोणकोणत्या घटना होणार आहेत, ग्रहांच्या हालचाली याबाबतची सविस्तर माहितीही यामध्ये असणार आहे. अवकाश दर्शन कसे करावयाचे याची मालिकाही ‘खगोल वृत्त’मधून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हा अंक ई-मेलवर मोफत उपलब्ध होणार आहे. यासाठी खगोलमंडळाच्या http://www.khagolmandal.com या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन संपादकांतर्फे करण्यात आले आहे.