ग्रह-तारे तसेच आकाश निरीक्षणाविषयी गोडी लावणारा प्राथमिक स्वरूपाचा अभ्यासक्रम कल्याणचे आकाश मित्र मंडळ आणि महाराष्ट्र नॉलेज कॉपरेरेशनने (एमकेसीएल) मराठी भाषेतून प्रथमच इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून दिला आहे. या अभ्यासक्रमामुळे इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या खगोलशास्त्राविषयी ज्ञानात भर पाडता येणार आहे.  
‘एमकेसीएल’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक सावंत यांनी हा सूत्रबद्ध अभ्यासक्रम इंटरनेटवर उपलब्ध करून दिला आहे. खगोलशास्त्राचे प्रचारक व कल्याणच्या आकाशमित्र मंडळाचे हेमंत मोने यांनी या खगोलशास्त्रीय अभ्यासक्रमाचे संहिता लेखन केले आहे. गेल्या चार वर्षांपासून मोने हे आकाश, ग्रह, तारे या विषयीच्या अभ्यासक्रमासाठी लेखन करीत होते. या अभ्यासक्रमासाठी ग्रहांचे दर्शन, ग्रह आणि त्यांचे अंतरंग, बहिग्र्रह प्रतियुती, आंतरग्रहांचा अभ्यास यासारखे १४ पाठ पहिल्या टप्प्यात तयार करून ते ‘एमकेसीएल’च्या माध्यमातून इंटरनेटवर उपलब्ध करून दिले आहेत. era.mkcl.org/oer या वेबसाइटवर खगोलशास्त्राचा अभ्यासक्रम सध्या मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना मोफत रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध आहे. रजिस्ट्रेशनची अधिक माहिती akashmitra.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गेली ४० वर्षे आपण खगोलशास्त्राच्या प्रसारासाठी काम करीत आहोत. ‘नभांगण’ गृहपत्रिकेच्या माध्यमातून खगोलशास्त्राची साध्या, सोप्या मराठी भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे हा उपक्रम मराठीतून इंटरनेटवर उपलब्ध झाला तर अधिकाधिक युवा वर्ग, नागरिक या अभ्यासक्रमाशी जोडले जातील असा विचार करून आपण या अभ्यासक्रमाची निर्मिती केली आहे, असे मोने यांनी सांगितले.
 हा अभ्यासक्रम ऑनलाइन पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद लॉगइनच्या माध्यमातून ‘एमकेसीएल’कडे होणार आहे. खगोलशास्त्र अभ्यासाची प्राथमिक माहिती या अभ्यासक्रमात आहे.

Story img Loader