अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक आज सायंकाळी जिल्हय़ात दाखल झाले असून चंद्रपूर, भद्रावती व वरोरा या तीन तालुक्यांतील पिकांची हानी, सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, पूल तसेच घरांच्या नुकसानीचीसुद्धा माहिती जाणून घेणार आहे. दरम्यान, तब्बल महिन्याभरानंतर पथक येत असल्याने अतिवृष्टी व पूर ओसरल्यानंतर समिती काय बघणार? असा प्रश्न पूरग्रस्तांनी उपस्थित केला आहे.
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात जिल्हय़ात अतिवृष्टी व पुरामुळे पाचशे कोटींच्या वर नुकसान झाले. जिल्हय़ातील २० हजार लोकांना पुराचा फटका बसला असून १० हजार लोक घर सोडून स्थलांतरित झाले होते. १२ हजारांच्या वर घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झालेली आहे. पावणे तीन लाख हेक्टरमधील पीक वाहून गेले. या अतिवृष्टीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, पूल, नाल्या, सिंचन प्रकल्प व तलाव सुध्दा वाहून गेले आहेत. नुकसानीचा हा आकडा पाचशे कोटींच्या वर असल्याने पालकमंत्री संजय देवतळे, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार विजय वडेट्टीवार व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच केंद्र सरकारकडे अतिवृष्टीची खरी परिस्थिती जाणून घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनीसुध्दा याबाबत केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर आज सायंकाळी केंद्रीय समितीचे पथक जिल्हय़ात दाखल झाले आहे. कापूस विकास संस्थेचे संचालक एस.एम. कोल्हटकर यांच्या नेतृत्वातील या पथकात रस्ते व ट्रान्सपोर्ट विभागाचे संचालक मीना आहेत. आज सायंकाळी ब्रह्मपुरी येथे या दोन सदस्यीय पथकाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर यांनी स्वागत केले. यानंतर सायंकाळी उशिरा हे पथक चंद्रपूर शहरात दाखल झाले. केंद्रीय समितीचे एस.एम.कोल्हटकर उद्या गुरुवारी, १२ सप्टेंबरला सकाळी ८ वाजता वेकोलिच्या विश्रामगृहावर जिल्हय़ातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीची माहिती जाणून घेणार आहे.
यावेळी जिल्हय़ात झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून देणार आहेत. या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्या समवेत जिल्हा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच तहसीलदार सुध्दा हजर राहणार आहेत. त्यानंतर हे पथक चंद्रपूर शहरातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यात प्रामुख्याने महापालिका हद्दीतील पडझड झालेल्या घरांची पाहणी करणार आहेत. सोबतच रस्ते, पूल व तलावांची सुध्दा पाहणी करणार आहे. यानंतर हे पथक भद्रावती तालुक्यातील टाकळी व नंदोरी या गावातील पिकांच्या हानीची तसेच सिंचन प्रकल्पांच्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहे. यानंतर वरोरा तालुक्यात व तेथून सरळ नागपूरला रवाना होणार आहे. नागपूरला एस.एम. कोल्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर ही समिती संपूर्ण माहितीचा अहवाल केंद्राला सादर करणार आहे. दरम्यान, आज अतिवृष्टी व पूर ओसल्यानंतर महिनाभराने पथक येत असल्याने लोकांमध्ये तीव्र भावना आहे. केंद्रीय समितीला एवढीच पूरग्रस्तांना मदत द्यायची होती तर महिनाभरापूर्वी पथकाने यायला हवे होते. आता सर्व सुरळीत झाल्यानंतर या पथकाला पूरग्रस्त भागात काय दिसणार? असा प्रश्न पूरग्रस्तांनी उपस्थित केला आहे.