ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या पूनर्रचनेनंतर आता येत्या दि. २८ ते ३० डिसेंबर दरम्यान राळेगणसिद्घी येथे देशातील कार्यकर्त्यांंची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी ही माहिती दिली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह निवृत्त आयपीएस अधिकारी किरण बेदी, माजी लष्कर प्रमुख व्ही. के. सिंग, विश्वंभर चौधरी यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य या कार्यशाळेत मार्गदर्शन करून प्रशिक्षणही देणार आहेत. सक्षम जनलोकपालाच्या मागणीसाठी हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर आंदोलन सुरू करण्यात झाल्यानंतर देशभरातून हजारो युवक त्यात सहभागी झाले. अण्णांचे त्यावेळचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी राजकीय पर्यायाची परस्पर घोषणा केली. मात्र, हजारे यांनी केजरीवालांच्या भूमिकेवर आक्षेप घेत कोअर कमिटी बरखास्त करून इंडिया अगेन्स्ट करप्शनपासूनही फारकत घेतली. नंतरच्या काळातही केजरीवाल यांनी या ना त्या प्रकारे हजारे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला, मात्र अण्णा त्यास बधले नाहीत.
केजरीवाल यांनी नवा मार्ग स्वीकारल्यानंतर हजारे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला. आंदोलनाचे कामही ठप्प झाले. त्यामुळे आंदोलनास आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रथम हजारे यांनी नव्या कोअर कमिटीची स्थापना करून त्यात देशभरातील विविध घटकांना स्थान देण्यात आले. दरम्यानच्या काळात सक्षम जनलोकपालाच्या मागणीसाठी देशभरातील कार्यकर्त्यांचे अर्ज मागवण्यात आले होते. त्यातून निवडक कार्यकर्त्यांची आंदोलनासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांंना या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या दौऱ्यावर असलेले हजारे गुरूवारी रात्री राळेगणसिद्घी येथे परतणार असल्याचेही आवारी यांनी सांगितले. जिंदाल पुरस्कारांच्या वितरणासाठी हजारे दिल्लीस गेले होते. पुरस्कार वितरणानंतर त्यांनी तेथेच थांबून दिल्लीतील कार्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. दिल्लीमुक्कामी असताना चक्कर येऊ लागल्याने गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. तेथील उपचारानंतर बुधवारी त्यांनी वाराणसी येथे शेतकऱ्यांची सभाही घेतली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा