महापालिकेच्या रक्तपेढीचा रद्द केलेला परवाना राज्य सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने अखेर पुन्हा दिला. त्यासाठी मनपाला रक्तपेढीचे पूर्णत: नुतनीकरण करावे लागले. त्यामुळेच परवाना कायमस्वरुपी रद्द होण्याची नामुष्की टळली. महापौर शीला शिंदे यांचा पुढाकार यात महत्वाचा ठरला.
परवाना पुन्हा मिळाल्याची माहिती त्यांनीच दिली. तो कायमस्वरूपी रद्द होऊ नये यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. रक्तपेढीतील त्रुटी आता दूर झाल्या असून मनपाची ही अत्यावश्यक सेवा गरजू रुग्णांसाठी लवकरच पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. रक्तपेढीत आता सेप्रेशन हॉल, कंट्रोल रूम, टी. टी. रूम, ब्लड स्टोअररूम याबरोबर रक्तपेढीला आवश्यक असलेली सर्व अत्याधुनिक उपकरणे, तसेच संपूर्ण रक्तपेढीचे नव्याने रंगकाम अशी कामे करण्यात आली आहेत. त्याची सविस्तर माहिती अन्न व औषध प्रशासनाला दिल्यामुळे परवाना पुन्हा देण्यात आला, अशी माहिती महापौर श्रीमती शिंदे यांनी दिली.
शहरातील गरीब रुग्णांसाठी स्वस्त दरात रक्तपिशवी पुरवणाऱ्या या रक्तपेढीची गैरव्यवस्थापनामुळे दुरवस्था झाली होती. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. बोरगे यांचा निष्काळजीपणाही त्याला जबाबदार ठरला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रविंद्र थेटे यांनी रक्तपेढीची तपासणी केली. त्यात आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत, असा शेरा मारून त्यांनी रक्तपेढीचा परवाना तीन दिवसांसाठी रद्द केला. ही कारवाई कशीबशी स्थगित करून आणल्यानंतरही डॉ. बोरगे यांचे त्यांना आरोग्यअधिकारी या पदाचे नियुक्तीपत्र मिळत नसल्यामुळे रक्तपेढीकडे दुर्लक्षच झाले. त्यामुळे थेटे यांनी पुन्हा तपासणी केली त्यात रक्तपिशव्याच दूषित झालेल्या आढळल्या. त्यांनी तत्काळ परवाना कायमस्वरूपी रद्दची कारवाई केली. त्यानंतर मनपा पदाधिकारी व प्रशासनाला जाग आली व त्यांनी डॉ. बोरगे यांना निलंबीत करत परवाना वाचवण्याची मोहीम सुरू केली.
आता या मोहिमेला यश आले असले तरी रक्तपेढीप्रमुख कोण हा प्रश्न आहेच. अद्याप या पदावर पालिकेच्या दप्तरी डॉ. बोरगे यांचीच नोंद आहे. ते सध्या निलंबीत आहेत. त्यांना आपण रक्तपेढीप्रमुख आहोत हेच मान्य नसून आपली नियुक्ती आता सरकारने आरोग्याधिकारी म्हणून केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, मात्र प्रशासनाने त्यांना तसे पत्र दिलेले नाही. काही नगरसेवकांचा त्यांच्या नियुक्तीला विरोध असून तो त्यांनी थेट नगरविकास मंत्रालय तसेच विधानसभा व विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांपर्यंत नेला आहे. त्यांनी मनपाकडून डॉ. बोरगे यांच्या पदोन्नतीची, तसेच पात्रतेची माहिती मागवली आहे असे संबंधित नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा