लोणार तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती, घरे व अन्य मालमत्तांची चार कोटीहून अधिक हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती जिल्ह्य़ाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. नुकसानीचे व आपादग्रस्तांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्यात येऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल. आपादग्रस्तांना जास्तीतजास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण शासनदरबारी प्रयत्न करू, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले.
मुश्रीफ यांनी लोणार तालुक्यात जाऊन नुकसानीची पाहणी करून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. आपदग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी दिलासाही दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्याम दिघावकर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.          
अतिवृष्टीमुळे २ जणांचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे मृत झाली. सुमारे आठशे घरेही क्षतीग्रस्त झाली. ५७७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले साधारणपणे अडीच कोटीची हानी झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरडून गेलेले क्षेत्र ७८२ हेक्टर असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी शनिवारच्या दौऱ्यात प्रारंभी बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर देऊळगाव कुडपाळ, अजीसपूर, पांग्रा डोळे आणि टिटवी या गावांची पाहणी केली व तेथील नागरिकांशी चर्चा केली. मोठय़ा प्रमाणावर झालेला पाऊस आणि त्याचा वेळेत निचरा न झाल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे नद्या खोलीकरणाची कामे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. देऊळगाव कुंडपाळ ते कासारी दरम्यानचा पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद आहे. हा पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावा, असे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. नुकसानीच्या प्राथमिक अंदाजाचा अहवाल आला असला तरी शासकीय यंत्रणांनी वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तयार ठेवावा, असे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Story img Loader