शिवसेनेची प्रचारफेरी म्हटली की घोषणांचा दणका, रणरागिणींची फौज, भगव्या झेंडय़ांची गर्दी असा सगळा देखावा डोळ्यांसमोर उभा राहतो. दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारफेरीचा माहौलही काहीसा असाच होता. पदयात्रा करण्याऐवजी राहुल शेवाळे यांनी रथातून फिरणेच पसंत केले असले, तरी प्रत्येक विभागात एक-दोन वेळा रथातून खाली उतरून आपल्याला भेटायला आलेल्या मतदारांशी संवाद साधण्याचे ‘कौशल्य’ही त्यांनी दाखवले. या प्रचारफेरीत हिंदमाता, हिंदू कॉलनी, नायगाव, आंबेडकर रोड असा परिसर शेवाळे यांनी पिंजून काढला. बदलत्या वस्तीनुसार बदलत्या घोषणांचा ‘स्मार्टनेस’ या यात्रेत दाखवण्यात येत होता.
‘प्रचारफेरी नायगांवच्या शाखा क्रमांक १९५ येथून संध्याकाळी ठीक ४.०० वाजता निघणार आहे,’ असे सांगण्यात आले होते. दुपारी सव्वाचारच्या सुमारास शाखा क्रमांक १९५ला पोहोचल्यावर, ‘प्रचारफेरी नक्की आहे ना,’ असे विचारण्यासारखी परिस्थिती होती. शाखेत बसलेले दोन-पाच तुरळक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि शाखेबाहेर खुच्र्यावर बसलेल्या शिवसेनेच्या आठ-दहा रणरागिणी एवढीच तयारी दिसत होती. एका कार्यकर्त्यांकडे चौकशी केल्यानंतर प्रचारफेरी आरामात पाच-सव्वा पाचला निघेल, असे सांगण्यात आले.
दरम्यान, काही कार्यकर्ते समोश्यांचे आणि पाण्याच्या ग्लासांचे बंद बॉक्स घेऊन आले. शेवाळे यांच्या विभागातूनच हे बॉक्स प्रचारफेरीच्या ठिकाणी पाठवले जातात, असे एका कार्यकर्त्यांने सांगितले. शिवसैनिकांनी आणि रणरागिणींनी समोश्यांवर ताव मारला आणि ‘शेवाळे साहेबां’ची वाट पाहू लागले. तेवढय़ात भगव्या रंगाने सजवलेला एक ‘रथ’ आला. त्या रथापुढे चालण्यासाठी एक जीपही आली. या जीपवर जोरजोरात ‘नाखवा बोटीनं फिरवाल का’ या चालीवरील ‘शेवाले साहेब निवडून येणार हाय’ हे गाणे सुरू होते.
साडेपाचच्या सुमारास शेवाळे इनोव्हामधून पोहोचले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हारतुऱ्यांचा आणि नमस्कारांचा स्वीकार करत शाखेत गेले. मध्ये एक-दोन जुन्या जाणत्या शिवसैनिकांच्या तब्बेतीची विचारपूस करून काळजी घ्यायला सांगण्यासही ते विसरले नाहीत. पाठोपाठ विभागप्रमुख सदा सरवणकरही येऊन पोहोचले. अखेर तब्बल सहा वाजता प्रचारफेरी सुरू झाली.
प्रचारफेरीत आघाडीवर एक जीप, त्यात माइक घेऊन बसलेले कार्यकर्ते, त्यांच्यामागे दीडशे-दोनशे शिवसैनिकांचा आणि रणरागिणींचा ताफा आणि सर्वात मागे रथावरील उमेदवार, असा लवाजमा निघाला. प्रत्येक वळणावर फटाक्यांच्या माळा लावून ‘तुमचा उमेदवार आला आहे, खिडकीत किंवा खाली या,’ अशी अप्रत्यक्ष सूचना रहिवाशांना दिली जात होती. ‘तरुण तडफदार उमेदवार..’ ‘शेवाळेंना मत, म्हणजे मोदींना मत..’ आला, आला, कोण आला.शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा दिल्या जात होत्या. या घोषणा पुढे शिवसैनिक आणि रणरागिणी यांच्या मुखांतूनही गर्जत होत्या. रथावर आरूढ शेवाळे प्रत्येक इमारतीतील लोकांना नमस्कार करत होते, ओळखीचे चेहेरे दिसले की तेथूनच संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. प्रचारफेरी चालू असताना थोडय़ा थोडय़ा अंतरावर काही महिला शेवाळे यांना ओवाळण्यासाठी उभ्या होत्या. अशा वेळी शेवाळे रथातून उतरून त्यांना भेटत होते. आसपासच्या लोकांशी संवाद साधत होते. त्यांचे आशीर्वादही घेत होते.
ही प्रचारफेरी रात्री साडेनऊच्या सुमारास रुईया महाविद्यालयाजवळ संपली. शेवाळे रथावरून खाली उतरले आणि त्यांच्या गाडीत बसले. गाडीत बसतानाही त्यांनी पुन्हा सर्व शिवसैनिकांची विचारपूस केली. रिकाम्या रथातून रणरागिणी पुन्हा शाखा क्रमांक १९५च्या दिशेने रवाना झाल्या. शेवाळेंची गाडीही पुढे गेली आणि घोषणांचा धुरळा रुईया महाविद्यालयाच्या बंद इमारतीच्या आसपास विरला.
रुग्णालय आणि घोषणांचा पाऊस
हा लवाजमा टाटा कर्करोग रुग्णालयाजवळ आला आणि फटाक्यांची एक माळ लागली. जीपमधून आणि रथावरून ‘शिवसेना-भाजप-रिपाइं युतीचे तरुण तडफदार उमेदवार..’ वगैरे घोषणाही जोरात चालू होत्या. आपण रुग्णालय परिसरातून जात आहोत, याचे भानही बेभान शिवसैनिकांना नव्हते. शेवाळे यांनी एकदोनदा घोषणा बंद करा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. रथावरून देण्यात येणाऱ्या घोषणा काही काळ बंदही झाल्या. पण हे फार काळ टिकले नाही आणि पुन्हा रुग्णालय परिसरातच घोषणांचा पाऊस सुरू झाला. टाटा रुग्णालयाबाहेर पदपथावर नाइलाजाने इलाजाच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक शून्य नजरेने ही प्रचारफेरी पाहत होते..
त्या दोघी..
प्रचारफेरी सुरू होण्याआधी शाखेजवळ जमलेल्या गर्दीत दोन शाळकरी वयाच्या मुलीही मिरवत होत्या. दोघीही आपापल्या आयांबरोबर आल्या होत्या बहुधा! दोघींच्या डोक्यावर शिवसेनेच्या भगव्या ‘कॅप’ आणि हातात ‘धनुष्यबाण’ ही निशाणी असलेला पंखा. प्रचारफेरी सुरू होण्याआधीच त्या एकमेकींच्या मोबाइलवर एकमेकींचे फोटो काढत होत्या. प्रचारफेरी सुरू असतानाही एखादी चांगली गाडी उभी दिसली, तर त्या गाडीबरोबर, बाइकच्या समोर असे त्यांचे ‘फोटोसेशन’ चालूच होते. बरोबरीच्या महिला दमल्याचे स्पष्ट दिसत होते. पण या दोघींचा उत्साह कायम होता.
घोषणाबाजीतही शहाणपण!
शिवसेनेच्या आतापर्यंतच्या परंपरेत आक्रमक घोषणांवर प्रचाराचा मुख्य भर राहिला आहे. शेवाळे यांची फेरी नायगांव, हिंदूमाता या भागांत फिरतानाही आक्रमक घोषणा दिल्या जात होत्या. पण जशी ही प्रचारफेरी हिंदू कॉलनीत पोहोचली, तशा या घोषणाही बदलल्या. या भागात शेवाळे यांनी घेतलेल्या ‘स्थापत्य अभियांत्रिकी’ पदवीचा उल्लेख करण्यात आला. हिंदू कॉलनीत राहणाऱ्या गुजराती भाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गुजरातीमधून घोषणाबाजी सुरू झाली. हे शहाणपण सेनेने भाजपकडून घेतल्याची कुजबूज होती.
सेनेच्या रथाने अडवले मनसेचे ‘इंजिन’
रुईया महाविद्यालयाजवळच लखमशी नप्पू मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ मनसेचे निवडणूक मध्यवर्ती कार्यालय आहे. या कार्यालयाजवळ प्रचारफेरी पोहोचली आणि शिवसैनिकांच्या घोषणाबाजीला धार आली. कार्यालयाजवळच तीन-चार फटाक्यांच्या माळाही लावण्यात आल्या. एवढय़ात ‘मणिस् उडुपी’ हॉटेलच्या बाजूने मनसेचे रेल्वे इंजिनही आले. पण शिवसेनेच्या रथाने रस्ता अडवून ठेवल्याने बऱ्यापैकी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे मनसेचे रेल्वे इंजिन बराच काळ अडकून पडले होते.

Story img Loader