नागपूर जिल्ह्य़ासह वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ात महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगात वाढ झाल्याचे गेल्या नऊ महिन्यातील आकडेवारीवरून दिसून येत आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर त्यात घट होण्याऐवजी वाढच होत असल्याने तर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
विदर्भातील या चार जिल्ह्य़ात २०११ मध्ये अत्याचाराच्या एकूण १५६ घटना घडल्या होत्या. त्यात नागपूर ग्रामीणमध्ये ४४, वर्धा ३४, चंद्रपूर ५६ आणि भंडारा जिल्ह्य़ात २२ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. २०१२ मध्ये त्यात थोडी घट झाल्याचे दिसून येते. यावर्षी एकूण १४२ घटना घडल्या, परंतु १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१३ पर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून २०११ च्या तुलनेत दुपटीनेच वाढ झाल्याचे दिसून येते. गेल्या नऊ महिन्यात नागपूर ग्रामीणमध्ये ५८, वर्धा ५१, चंद्रपूर ७४ आणि भंडारा जिल्ह्य़ात महिलांवरील अत्याचाराची ३३ प्रकरणे नोंदवण्यात आली. वाढत्या अत्याचाऱ्यांच्या घटनांनी सामाजिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.
महिलांच्या अत्याचाराप्रमाणेच विनयभंगांच्या घटनेतही प्रचंड वाढ होत आहे. २०११ मध्ये नागपूर ग्रामीणमध्ये ६५, २०१२ मध्ये ८२, तर १ जानेवारी ते ३० सप्टेंबपर्यंत १०७ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. वर्धा जिल्ह्य़ात २०११ मध्ये ८८, २०१२ मध्ये ९३ आणि गेल्या नऊ महिन्यात १४९, चंद्रपूरमध्ये २०११ मध्ये १०८, २०१२ मध्ये ११९ आणि गेल्या नऊ महिन्यात १३५, तसेच भंडारा जिल्ह्य़ात २०११ मध्ये २९, २०१२ मध्ये ३६ आणि गेल्या नऊ महिन्यात ६३ विनयभंगाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहे.
महिला सुरक्षेसाठी कडक धोरण राबवण्यात येत असल्याचा कांगावा केला जात असला तरी राज्यात दररोज पाच महिलांवर अत्याचार होत आहेत, तर नागपूर शहर व ग्रामीणमध्ये दररोज एका महिलेवर अत्याचार, विनयभंगाची घटना घडत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर असले तरी पुरोगामी महाराष्ट्राला कलंकित करणारी बाब आहे. कडक कायदे होऊन व त्या प्रकरणात शिक्षा होण्याचे प्रमाण जास्त असल्यानंतरही वर्ष २०११ च्या तुलनेत वर्ष २०१३ मध्ये चांगलीच वाढ झालेली दिसते. महिलांवरील अत्याचार व विनयभंगाप्रमाणेच पती व नातेवाईकांकडून होणाऱ्या अन्यायातही वाढ झाली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी कायदे असल्यानंतरही आकडेवारीत घट होण्याऐवजी त्यात वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. राज्यातील महिला सुरक्षित नसल्याचेच हे द्योतक असल्याचे दिसून येते. अत्याचार व विनयभंग झाला नसतानाही महिलांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवावा लागत आहे. त्यामुळे ही आकडेवारी वाढत असली तरी सत्य मात्र वेगळेच राहात असल्याचे पोलीस विभागाचे म्हणणे आहे.
महिलांवरील अत्याचारात वाढ, समाजात चिंतेचे वातावरण
नागपूर जिल्ह्य़ासह वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्य़ात महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगात वाढ झाल्याचे गेल्या नऊ
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-11-2013 at 09:15 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atrocities against women increases anxiety in society