पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींना बंटी जहागिरदार याने शस्त्रे पुरविल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाला सप्टेंबरमध्ये दिली होती. त्यामुळे डिसेंबरमध्ये बंटीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती. बंटीच्या सांगण्यावरून सर्फराज याने ही शस्त्रे आरोपी इरफान लांडगे याला दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली.
दरम्यान बंटी याचे शहरातील काही लोकांशी आर्थिक व्यवहार आहेत. मोक्का कायद्यानुसार बंटीला अटक झाल्याने आता या लोकांचीही चौकशी होणार आहे. काही महसूल व पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही चौकशी होण्याची दाट शक्यता आहे.
पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावर दि. १ ऑगस्टला साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटातील तिघा आरोपींना दिल्ली पोलिसांनी २६ सप्टेंबर रोजी अटक केली होती. असदखान इम्रानखान जमशेदअली खान (औरंगाबाद), इम्रानखान वजिदखान पठाण (नांदेड) व फिरोज उर्फ हमजा अब्दल सय्यद (पुणे) या तिघांना दिल्ली पोलिसांनी दिल्लीतील पुलप्रल्हादपूर भागातून अटक केली होती. इंडियन मुजाहिद्दीनचा अतिरेकी इकबाल व रियाज भटकळ याच्याशी लष्करे-ए-तोयबाचा अतिरेकी फैयाज कागजी याने तिघांची ओळख करून दिली होती. फैयाज कागजीला भेटण्यासाठी तिघे सौदीलाही गेले होते. त्यानंतर तिघांनी अन्य साथिदारांच्या मदतीने पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणले. दिल्ली पोलिसांनी अबू जुंदाल या अतिरेक्याला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे या तिघांना पोलिसांनी दिल्लीत पकडले होते. त्यावेळी तिघांनी अन्य आरोपींची नावे सांगितली होती.
बॉम्बस्फोट घडविणारा असदखान याचा नगर येथील नातेवाईक असलेला इरफान मुस्तफा लांडगे तसेच पुणे येथील मुनिब इकबाल मेमन, फारूख बागवान, आरिफ सय्यद बियाबानी यांना अटक करण्यात आली होती. इरफान लांडगे याला बंटीच्या मध्यस्थीने शस्त्रे मिळाल्याची माहिती असदखान याने दिल्ली पोलिसांना दिली होती. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दहशतवादविरोधी पथकाला दिली होती. दि. १४ ऑक्टोबर रोजी बंटी दिल्लीला निघाला असताना त्यास ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्यासोबत शहरातीलच एक तरूण होता. या तरूणाचा बॉम्बस्फोटाशी कुठलाही संबंध नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. त्या तरूणाची चौकशीही पथकाने केलेली नव्हती. पण बंटीची चौकशी करण्यात आली. त्यानंतर इरफान याने चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे बंटीला अटक करण्यात आली. बंटी याने इरफानला सांगून ही शस्त्रे दिली होती. आता एटीएस इरफानच्या मागावर आहे. पण त्याचा तपास लागलेला नाही, असे सुत्रांनी सांगितले. बंटीला अटक झाल्याने इरफानची माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यानंतरच शस्त्रांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर प्रकाश पडू शकेल.
एटीएसला बंटीची खबर दिल्ली पोलिसांकडून
पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींना बंटी जहागिरदार याने शस्त्रे पुरविल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाला सप्टेंबरमध्ये दिली होती. त्यामुळे डिसेंबरमध्ये बंटीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली होती.
First published on: 16-01-2013 at 03:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ats got the information from delhi police