पुणे येथील जंगली महाराज रस्त्यावरील बॉम्बस्फोट प्रकरणातील शहरातील आरोपी बंटी जहागीरदार याच्याशी आर्थिक व्यवहार असलेल्या काही अधिकारी व व्यावसायिकांची दहशतवादविरोधी पथकाने चौकशी सुरू केली आहे. तसेच मुख्य आरोपी यासिन भटकळ याच्यासह चौघा फरार आरोपींचे वास्तव्य नगर व नाशिक जिल्हयात असून त्यांचा शोधही घेतला जात आहे.
बंटी जहागीरदार याचे शहरातील काही बांधकाम व्यावसायिकांशी तसेच भूखंड खरेदी-विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांबरोबर आर्थिक हितसंबंध आहेत. अशा संबंधित लोकांची काल दहशतवादविरोधी पथकाने चौकशी केली. तुमची सारी कुंडली आमच्याकडे आहे. आम्हाला सहकार्य करा. केले नाही तरी आमच्याकडे असलेल्या माहितीचा वापर करून आर्थिक हितसंबंध उघड केले जातील, असे अधिकाऱ्यांनी खडसावले. तसेच मुख्य आरोपी यासिन भटकळ, इंडियन मुजाहिदीनचा असदउल्लाह अख्तर उर्फ वकास, मनू उर्फ तहसीन अख्तर शेख, असदउल्लाह अख्तर जावेद यांचे वास्तव्य श्रीरामपूर, कोपरगाव, येवला, शिर्डी व नाशिक येथे होते. सध्या याच भागात त्यांना आश्रय दिला जात आहे. त्यामुळे त्यांची माहिती पथकाला देण्यात यावी, असे सुचविण्यात आले. श्रीरामपूर व लोणी येथे दोन फरार आरोपींचे वास्तव्य आहे. त्यांच्यामार्फत बंटी जहागिरदार हा आपल्या व्यवसायाची सूत्रे हलवतो, असे तपासात उघड झाले आहे. बंटी हा तुरुंगात असला तरी त्याचे साथीदार वाळू तस्करी करीत आहेत. त्यातून महसूल खाते व पोलिसांना आर्थिक लाभ होत आहे. महसूलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर पथकाचे लक्ष आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
जहागिरदार याने मोठय़ा प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केली असून, त्याची गुंतवणूक बांधकाम व्यवसायात केली आहे. बांधकाम व्यावसायिकांना तो केवळ  वाळूच नव्हे तर पैसाही पुरवतो, असे उघड झाले असून, प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांची चौकशी पथकाने केली आहे. बंटी जहागिरदार याचे दहशतवाद्यांशी संबंध आल्यानंतर त्याला कल्पना देण्यात आली होती. या लोकांच्या संपर्कात राहू नको. काही उद्योग करू नको, असे अधिकाऱ्यांनी सुचविले होते. पण बंटी याने ऐकले नव्हते, असे सांगण्यात आले.
शिर्डीची रेकी
बॉम्बस्फोटातील आरोपींचे वास्तव्य लोणी येथे असताना त्यांनी शिर्डी परिसराची रेकी केली होती. विशेष म्हणजे फरार आरोपींचे वास्तव्यही शिर्डी व कोपरगावला काही काळ होते. आता त्यांचे वास्तव्य नाशिक, नगर व औरंगाबाद याच भागात असावे, असा संशय पथकाला आहे. त्यामुळे या भागावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. बंटी जहागिरदारच्या काही समर्थकांवरच एटीएसचे लक्ष आहे.

Story img Loader