संस्थेने सेवेत कायम करूनही त्याचे पत्र दिले जात नसल्याचा समज होऊन अस्वस्थ झालेल्या सटाणा महाविद्यालयातील रखवालदाराने गुरुवारी सकाळी कुऱ्हाडीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर, प्राचार्यासह तीन जण जखमी झाले. समोर येईल त्याच्यावर हल्ला करीत महाविद्यालय हादरवून टाकणाऱ्या या रखवालदाराला राष्ट्रीय छात्र सेना पथकातील विद्यार्थी व इतर कर्मचाऱ्यांनी पकडले. हल्ल्या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावलौकीक प्राप्त करणाऱ्या महाविद्यालयात ही घटना घडल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या सटाणा येथील कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात हा प्रकार घडला. मूळचा नेपाळचा बलदेवसिंग गंगाराम पाल सहा वर्षांपासून रखवालदार म्हणून महाविद्यालयात कार्यरत होता. महाविद्यालयाच्या आवारातच तो राहात होता. सेवेत कायम करावे म्हणून त्याचा प्रयत्न सुरू होता. संस्थेने सेवेत कायम केल्याचे पत्र देऊनही स्थानिक व्यवस्थापन ते पत्र देत नसल्याचा त्याचा ग्रह झाला होता. यामुळे संतप्त होऊन बलदेवसिंगने गुरूवारी सकाळी संपूर्ण महाविद्यालय परिसर हादरवून सोडला. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुऱ्हाड घेऊन तो घराबाहेर पडला. महाविद्यालयाची मुख्य इमारत आणि किमान कौशल्य अभ्यासक्रमाची इमारत काही अंतरावर आहे. बारावीच्या तोंडी परीक्षा होणार असल्याने प्राध्यापक वर्ग त्या तयारीत होता. किमान कौशल्य अभ्यासक्रमाच्या इमारतीबाहेर उभ्या असलेल्या प्रफुल्ल गंगाधर ठाकरे (रा. कुपखेडा, ता. सटाणा) आणि सुनील नारायण सागर (रा. वाडी, ता. देवळा) या दोन प्राध्यापकांवर बलदेवसिंगने थेट हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने हे दोघेही खाली कोसळले. ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार पाहिला. काही जणांनी धावत जाऊन प्राचार्याना या घटनेची माहिती दिली.
गोंधळाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रयोगशाळा परिचर म्हणून काम पाहणारे दादाजी एम. मगरे (रा. सोमपूर, ता. सटाणा) बलदेवसिंगला रोखण्यासाठी पुढे आले. परंतु त्याने त्यांच्यावरही वार केले. दरम्यानच्या काळात प्राचार्य दिलीप शिंदे (रा. सटाणा) आपल्या दालनाबाहेर आले. त्यांना पाहताच बलदेवसिंग हातात कुऱ्हाड घेऊन त्यांच्याकडे धावला. त्यामुळे शिंदे यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वाराजवळच बलदेवसिंगने त्यांना गाठले आणि कुऱ्हाड मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा वार चुकविताना शिंदे खाली पडले. याचवेळी राष्ट्रीय छात्र सेना पथकाचे विद्यार्थी आणि इतर प्राध्यापक व कर्मचारी धावून आले. सर्वानी बलदेवसिंगला पकडून त्याच्याकडील हत्यार काढून घेतले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या तिघांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर आडगाव येथे संस्थेच्या रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना दादाजी मगरे यांचा मृत्यू झाला. दुसरे गंभीर जखमी सुनील सागर यांची प्रकृतीही चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
महाविद्यालयातील या घटनाक्रमामुळे विद्यार्थिनी व महिला सेवकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. महाविद्यालयात दिवसभर भयाण शांतता पसरली होती. एकही तासिका झाली नाही. वाणिज्य शाखेचा परीक्षा अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने केवळ हे काम सुरु होते. कर्मचाऱ्यांमध्ये या घटनेविषयी वेगवेगळी चर्चा सुरू होती. सहा वर्षांपासून सेवेत असलेल्या बलरामसिंगचा नोकरीत कायम करावे असा अट्टाहास होता.
 वारंवार विनंती करूनही मागणी पूर्ण होत नसल्याने त्याने या पध्दतीने सर्वाचा काटा काढण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आर्थिक कारणामुळे काही दिवसांपासून बलदेवसिंग हा घरात पत्नीशीही वाद घालत होता. त्याच्या पत्नीने ही बाब प्राचार्याच्याही कानावर घातली होती असे सांगितले जाते. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बलदेवसिंगच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रवीण पडवळ यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack by security employee dead three injured