विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ का होईना शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विधानभवन परिसरातील हिरवळीवर आयोजित भोजनावळीसाठी एकत्र आले होते. यावेळी सर्वच नेते एकत्र भोजनाचा आस्वाद घेत असताना सभागृहात जणू काहीच घडले नाही, अशा पद्धतीने हास्यविनोदात रंगले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ७५ व्या वाढविसाला १२-१२-१२ मुळे आगळे वेगळे महत्त्व होते त्यामुळे विधिमंडळ परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या लॉनवर खास भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सभापती दिलीप वळसे पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख आणि सार्वजानिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाची तयारी केली होती. गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत विरोधकांनी १२ वाजायला दहा मिनिटे असताना गोंधळ घातला आणि या गोंधळात विधानसभेचे उपसभापती वसंतराव पुरके यांनी सभागृह तहकूब केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यासह काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लॉनवर एकत्र आले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, सार्वजानिक बांधकाम मंत्री छगन भूजबळ आदी नेत्यांनी एकत्रपणे मोठा केक कापून शरद पवार यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सर्वच नेत्यांनी एकमेकांना केकचा घास भरविला. केक कापल्यानंतर सचिन अहिर यांच्यासह अनेक राष्ट्रवादीच्या आमदारांनी वाढदिवसाची गाणी सादर केली.
यावेळी हिरवळीवर वाढदिवसानिमित्त खास शाही मेजवानी असल्यामुळे सर्व नेत्यांनी एकत्र बसून भोजनांचा आस्वाद घेतला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, आर आर. पाटील एकाच टेबलवर बसून गप्पा मारत असताना भोजनांचा आस्वाद घेत होते. दहा मिनिटापूर्वी सभागृहात आबांनी माफी मागावी यावरून गोंधळ घालणारे विरोधी आणि सत्ता पक्षाचे सर्वच नेते एकत्र बसून वेगळ्या विषयांवरील गप्पामध्ये रंगले होते. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला आनंदाची आणि उत्साहाची वेगळीच किनार असल्यामुळे सर्व काही विसरून सर्वपक्षीय नेते एकत्र आल्यानंतर काही वेळातच सभागृहामध्ये ऐकमेकावर टीका टीपणी करीत सभागृह दिवसभरासाठी तहकूब करण्यासाठी मजबूर केले.
सभागृहात हल्ला : बाहेर वाढदिवसाचा एकोपा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर ताशेरे आणि टिकाटिप्पणी करणारे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेते आज मात्र काही वेळ का होईना शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विधानभवन परिसरातील हिरवळीवर आयोजित भोजनावळीसाठी एकत्र आले होते.
First published on: 13-12-2012 at 01:24 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack in parliament but birthday celebration outside