शिवसैनिकांचा हल्ला मराठी रुग्णालयांवरच का?
डॉक्टरांचा संतप्त सवाल
आंदोलनाची भाषा करणाऱ्या शिवसैनिकांनी केवळ मराठी डॉक्टरांच्या रुग्णालयावरच हल्ला का केला असा संतप्त सवाल हल्ला झालेल्या रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे. शुक्रवारी विरार मधील ‘सिद्धिसंगम’ रुग्णालयावर हल्ला करून शिवसैनिकांनी रुग्णालयाची नासधूस केली होती. याप्रकरणी विरार पोलिसांनी दहा शिवसैनिकांना अटक केली आहे.
 शुक्रवारी, २५ जानेवारीला संध्याकाळी शिवसैनिकांनी विरार (पूर्व), मनवेल पाडा येथील ‘सिद्धिसंगम’ रुग्णालयावर हल्ला करून तेथील सामानाची मोडतोड केली होती. डॉक्टरांनी रेट कार्ड लावले नाही आणि शिवसैनिकांशी अपशब्द वापरले, असा आरोप करत शिवसैनिकांनी हल्ला केला होता. ‘सीसीटीव्ही’च्या आधारे विरार पोलिसांनी १० शिवसैनिकांना अटक केली. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
मात्र डॉक्टरांविरोधात आंदोलनाचे फलक लावणाऱ्या शहर प्रमुख दिलीप पिंपळे यांच्यावर काहीच कारवाई केलेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आमच्या रुग्णालयात अनेक डॉक्टर व्हिजिटला येतात. ते आपले प्रमाणपत्र आणि दरपत्रक कसे लावणार, असा सवाल रुग्णालयाचे डॉक्टर देवेंद्र परदेशी यांनी केला. आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कर्मचारी आणि रुग्णांमध्ये भीती पसरल्याचे ते म्हणाले. रजनी पटेल यांनी आपल्या जागेत तीन वर्षांपूर्वी हे रुग्णालय सुरू केले होते. इथले सर्व डॉक्टर मराठी आहेत. शिवसेनेने मराठी डॉक्टरांवरच का हल्ला केला, असा सवाल त्यांनी केला. शहरात मोठी अमराठी रुग्णालये आहेत, तेथे जाण्याची त्यांची हिंमत नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या आंदोलनाबाबत हात झटकले आहेत. त्याबाबत नाराजी व्यक्त करून या हल्ल्यामागील बोलविता धनी कोण? त्याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
‘फेसबुक’वर प्रतिक्रिया देणारी पालघरची शाहिन धाडा शिवसैनिकांच्या रोषाला बळी पडली. शिवसैनिकांनी तिच्या काकांच्या रुग्णालयावर अशाच पद्धतीने हल्ला केला होता. शिवसेनेकडून रुग्णालयांना लक्ष्य करण्याच्या या वाढत्या प्रकारांबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा