श्री महालक्ष्मी रोलर फ्लोअर मिल्स् या कंपनीच्या वतीने कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या ग्राहकांनी कंपनीचे मालक हरिशकुमार जैन यांच्या घरावर गुरुवारी हल्ला चढविला. संतापलेल्या ग्राहकांनी कंपनीच्या कार्यालयावर दगडफेक करून मोडतोड केली व त्यास टाळे ठोकले. दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा गोंधळ संपुष्टात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात सुमारे २०० ग्राहक सहभागी झाले होते.    
शहरातील श्री महालक्ष्मी रोलर फ्लोअर मिल्स यांनी एम.सी.एक्स.अंतर्गत महाराष्ट्र राज्यासह गुजरात,गोवा, कर्नाटक, ओरिसा, हैद्राबाद आदी भागातील सुमारे ६ हजार ग्राहकांची २५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासनास माहिती असूनही कोणतीही कार्यवाही दोषींवर करण्यात आली नसल्याने आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेव्दारे उघड केले होते. त्याचबरोबर जैन कुटुंबीयांना फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे देण्याकरिता १० दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु पैसे न परत दिल्याने गुरुवारी आमदार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली फसवणूक झालेल्या सुमारे २०० ग्राहकांनी जैन कुटुंबीयांना तातडीने अटक करावे, या मागणीसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्यास घेराओ घातला होता. परंतु पोलीस प्रशासनाने कारवाई करण्याचे आश्वासन देऊनही कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी आज कंपनीच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयावर मोर्चा वळविला. यावेळी संतप्त झालेल्या ग्राहकांनी या कार्यालयाची तोडफोड केली.     
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फसवणूक झालेल्या ग्राहकांनी कंपनीच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयाजवळ जैन कुटुंबीयांच्या विरोधातील घोषणाबाजी करीत गर्दी केली. यावेळी आमदार क्षीरसागर यांनी पोलीस प्रशासनास काल कळविलेल्या पत्रानुसार जैन कुटुंबीय उपस्थित आहे का ? अशी विचारणा केली. परंतु जैन कुटुंबीय उपस्थित नसल्याने संतप्त झालेल्या जमावाने दगडफेक करीत कंपनीच्या कार्यालयाची मोडतोड सुरू केली आणि कार्यालयास कुलूप लावले. या घटनेची माहिती समजल्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रतनसिंग रजपूत व सहकारी तेथे आले. त्यांनी गोंधळ घालणाऱ्या जमावाला काबुत आणले. यावेळी आमदार क्षीरसागर म्हणाले, कंपनीचे संचालक हरेशकुमार जैन, आकाश जैन व मधू जैन यांना पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहेत. या ग्राहकांपैकी दोन व्यक्तींना आजपर्यंत जैन कुटुंबीयांनी फोनव्दारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलीस प्रशासन जुजबी तक्रार दाखल करून जैन कुटुंबीयांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. शहर पोलीस अधीक्षक महेश सावंत यांनी दहा दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या घटनेस १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे जैन कुटुंबीयांनी तातडीने परत द्यावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने ग्राहकांना न्याय मिळवून दिला जाईल, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा