शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे यांच्या येथील वेलंकनीनगर भागातील निवासस्थानी शनिवारी दुपारी टोळक्याने वस्तुंची तसेच घरासमोरील चारचाकी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी मनमाड पोलिसांनी १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सोळसे यांनी घटनेची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. सोळसे यांची पत्नी शिवसेना नगरसेविका उषा सोळसे घरात असताना टोळक्याने हातात काठी, हॉकी स्टीक, गज यांसह प्रवेश केला.
घरातील मौल्यवान वस्तू व सामानाची मोडतोड केली. सोळसे यांच्या घरासमोरील आणि शेजारील कृष्णाबाई जाधव यांच्या बंगल्यात शिरून त्यांच्या मोटारीच्याही काचा फोडल्या. या गदारोळात सोळसे यांची दीड तोळ्याची सोन्याची पोत गहाळ झाली. महिलांनी विरोध केला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रोहित पवार, रामूवेल शिंदे, नीलेश मोरे, विजय मोरे, हेमंत मोरे, सचिन पगारे, विशाल राजगुरू यांसह १५ ते २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा मनमाड शिवसेना शहरप्रमुख संतोष बळीद यांनी  विरोध केला आहे. सोळसे यांच्या घरावर हल्ला करणाऱ्यांना त्वरीत अटक करावी, महिलांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने पोलिसांकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack on shivsena nagar chiefs residence