एका खून प्रकरणातील संशयित निलंबित पोलीस अधिकारी प्रकाश महाजन यांच्यावर येथील जिल्हा कारागृहात एका कैद्याने केलेल्या हल्ल्यात ते जबर जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या प्रकरणी पोलिसांनी भटू आखाडे, मनोहर पाटील आणि सुभेदार लामणे या तिगा कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जिल्ह्य़ात गाजलेल्या योगेश धनगर खून प्रकरणी तीन वर्षांपासून निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश महाजन हे कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. त्यांनी तुरुंगातील इतर कैद्यांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराबाबत कारागृह प्रशासनाकडे तक्रार केली होती. याचा राग आल्याने भटू आखाडे याच्या सांगण्यावरून मनोहर पाटील या कैद्याने बुधवारी रात्री आठच्या सुमारास कारागृहाच्या आवारात महाजन यांच्यावर पाण्याचा माठ तसेच पत्र्याच्या वस्तुने हल्ला केलाा. पत्र्याच्या वस्तूचा वार महाजन यांनी चुकविल्यानंतर त्याने महाजन यांच्या डोक्यात माठ घातला. या हाणामारीत रुक्तबंबाळ झालेल्या महाजन यांना तासाभरानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यत आले.
यावेळी घटनास्थळी पडलेले रक्त व माठाचे तुकडे इत्यादी वस्तुंना हात लाऊ नका, असे बजावलेले असतानाही सुभेदार लामणे या कैद्याने हे पुरावे नष्ट केले. त्यामुळे पोलिसांनी तिघा जणांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कारागृहात काही अनैसर्गिक प्रकार चालतात. संशयित आखाडे आणि पाटील हे त्यात गुंतले आहेत. त्यामुळे आपल्यावर हल्ला होऊ शकतो, अशी कल्पना तुरुंगाधिकाऱ्यांना दिली होती. तथापि, याचा राग आल्यामुळे आखाडेच्या सांगण्यावरून पाटीलने हा हल्ला केल्याचा आरोप महाजन यांनी केला आहे.