पेढी बंद करून सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन गावाकडे परत निघालेल्या सराफाला तिघा चोरटय़ांनी अडवून बेदम मारहाण केली व त्याच्या ताब्यातून १० लाख १९ हजारांचे सोने-चांदीचे दागिने व रोकड लुटून नेल्याची घटना सांगोला तालुक्यातील जवळा येथे घडली. सांगोला पोलीस ठाण्यात या गुन्हय़ाची नोंद झाली आहे.
समाधान दिगंबर काशिद (वय २८, रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली) असे लुटल्या गेलेल्या सराफाचे नाव आहे. काशिद यांचे जवळा येथे सराफी दुकान आहे. दररोज सायंकाळी दुकान बंद करून ते ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या लोहगाव (ता. जत) या आपल्या मूळ गावी जातात. काल रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपले सराफी दुकान बंद करून काशिद हे पाव किलो सोन्याचे दागिने व आठ किलो चांदीचे दागिने आणि ४९ हजारांची रोकड असा सुमारे १० लाख १९ हजारांचा ऐवज घेऊन लोहगावकडे निघाले होते. परंतु जवळा गावाजवळच पाठीमागून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या तिघा तरुणांनी काशिद यांच्या मोटारसायकलीस धडक मारली आणि त्यांना खाली पाडले. या तिघा तरुणांनी काशिद यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत त्यांच्यावर चाकूनेही वार केला. नंतर त्यांच्या ताब्यातील संपूर्ण किमती ऐवज बळजबरीने लुटून नेल्याचे काशिद यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्हय़ाचा तपास सांगोला पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक गावडे हे करीत आहेत.

Story img Loader