रमेश बागवे यांच्या मुलासह बारा जणांवर गुन्हा दाखल
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन प्रवेश कराच्या निविदा भरण्यासाठी आलेल्या ठेकेदारासह त्यांच्या दोन साथीदारांवर तलवारीने हल्ला होण्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. त्यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेत गोळीबारही करण्यात आला. या प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचा मुलगा कुलदीप, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष मनीष आनंद यांच्यासह दहा ते बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक महादेव यादव (वय २९, रा. वानवडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बागवे, आनंद यांच्यासह विजय शेट्टी, केजबिदर सिंग अहुवालिया, अजय रामनअल्ली, शोएब खान, अजय अगरवाल, मनमोलसिंग चढ्ढा, आशिष येड्डा, उमेद खान यांच्याविरोधात गुन्हे
दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमध्ये यादव यांच्यासह त्यांचे मित्र सागर खंडागळे, इजाज शेख हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बुधवारी दुपारी वाहन प्रवेश कराच्या निविदा भरण्यासाठी यादव व त्यांचे मित्र मोटारीतून आले होते. बोर्डाच्या कार्यालयासमोर आल्यानंतर आरोपींनी त्यांना निविदा भरण्यास विरोध केला. त्यानंतर यादव व त्यांच्या मित्रांवर तलवारीने हल्ला करण्यात आला. त्यांच्या दिशेने तीन गोळ्याही झाडण्यात आल्या. मोटारीचेही नुकसान करण्यात आले. या घटनेनंतर मोटारीतील पाच लाखांची रोकड व निविदांची कागदपत्रे गहाळ झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.  

Story img Loader