‘स्वाभिमानी’चे तुपकर यांचे प्रशासनाला आव्हान
ज्या नेत्यांनी जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकेचे कर्ज बुडविले व शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी आणली अशा नेत्यांची वसुली करण्याचे सोडून जिल्हा बॅंक प्रशासन मात्र शेतकऱ्यांच्या दारात पोलीस संरक्षणात वसुलीला येत आहेत, हे योग्य नाही. नेत्यांची वसुली झाल्याशिवाय शेतकरी कर्जाचा छदामही भरणार नाही. हिंमत असेल तर पोलीस संरक्षणात कर्जबुडव्या नेत्यांच्या खासगी मालमत्ता जप्त करून दाखवा, असे आव्हान रविकांत तुपकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
सध्या स्वाभिमानी श्ेातकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा जिल्हाभर दौरा सुरू आहे. २७ जानेवारीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी गावोगावी फिरून शेतकरी मेळावे व जाहीरसभा घेत आहेत. सव, चौथा, माळशेंबा, हरणी, चिंचपूर, सारोळा मारोती, कोऱ्हाळा बाजार, पाडळी, तादुळवाडी (शेंबा), टाकरखेड, सिंदख्ेाड लपाली, कुऱ्हा यासह विविध ठिकाणी शाखा नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्याचबरोबर हतेडी, अंभोडा, दुधा, धाड, भडगांव, रुईखेड मायंबा, कवठळ, गांगलगाव, कोलारा, दिवठाणा, सोमठाणा, पेठ, शेलूद, पाटोदा, एकलारा, तसेच मोताळा तालुक्यातील बोरखेड, पलढग, तारापूर, कोथळी, हनवतखेड, सिंदखेड, सारोळापीर, शेंबा, पान्हेरा, धामणगाव बढे, गिरडा, देवपूर येथे शेतकऱ्यांच्या सभा घेण्यात आल्या.
या सभांना मार्गदर्शन करतांना रविकांत तुपकर म्हणाले, जिल्हा केंद्रीय सहकारी बॅंकेचे वाटोळे करण्यासाठी जिल्ह्य़ातील मातब्बर नेत्यांनी मोठा हातभार लावला आहे. नेत्यांची वसुली करण्याचे सोडून जिल्हा बॅंक प्रशासन शेतकऱ्यांच्या दारात पोलीस संरक्षणात वसुलीला येत आहे. पोलिसांचा धाक दाखवून दादागिरी स्टाईलने वसुली करण्याचा सपाटा लावला आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे शेतकरी शालीग्राम चोपडे यांचा कर्जापोटी ४० क्विंटल कापूस जप्त करण्यात आला.
नेकनामपूर येथील रामेश्वर आकोटकार यांच्या मालमत्तेची देखील जप्ती करण्यात आली, तसेच सिंदखेडराजा तालुक्यातील दिग्रस येथील ज्ञानदेव पऱ्हाड या शेतकऱ्याचा ट्रॅक्टर शेती कर्जासाठी जप्त करण्यात आला. ही दादागिरी स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही, असा इशाराही तुपकर यांनी दिला. या कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून बबन चेके, शंकर तायडे, डॉ.विनायक वाघ, आदींची उपस्थिती होती.

Story img Loader