पावसाला दमदार सुरुवात झाली असून मोडकळीस आलेल्या इमारती, सखल भागातील चाळी, बैठी घरे, झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना सावध राहण्याचा इशारा बेस्ट उपक्रमाने दिला आहे. सखल भागातील वीज वितरण केबीन आणि तारखंडांमधून पडणाऱ्या ठिणग्यांपासून दूर राहावे आणि त्याबाबत ‘बेस्ट’ उपक्रमाला माहिती द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी काही नागरिक ‘बेस्ट’च्या विद्युतपुरवठा विभागाचे कर्मचारी येण्यापूर्वीच कामचलाऊ इलेक्ट्रिशियनच्या मदतीने वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्यात असे करणे धोक्याचे असून त्यामुळे विजेचा झटका बसू शकतो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तात्काळ ‘बेस्ट’च्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.
‘बेस्ट’ उपक्रमाने ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी २४ तास कॉल सेंटर सुरू केले असून ते सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. कुलाब्यापासून शीव, माहीमपर्यंतच्या संगणकीकृत माहिती उपलब्ध असलेल्या ९.७ लाख वीज ग्राहकांची माहिती या कॉल सेंटरकडे आहे. या कॉल सेंटरवर तक्रार करण्यासाठी वीज ग्राहक क्रमांक अथवा वीज मानक (मीटर) क्रमांक नोंदवावा. त्यामुळे तक्रारीचे जलदगतीने निवारण करणे बेस्ट कर्मचाऱ्यांना सहज शक्य होईल. आग लागणे, विजेचा झटका बसणे, ठिणग्या उडणे आदी स्वरूपाच्या तक्रारीसाठी नागरिकांनी दूरध्वनी क्रमांक २२८४३९३९ वर संपर्क साधावा.

हे करावे
– वीजमापक केबिन सिमेंटने बांधून घ्यावी
– वीजमापक केबिन जमिनीपासून उंचावर असावी
– वीजमापकास लाकडी केबिन असावी
– वीजमापकापासून घरापर्यंत परवानाधारक ठेकेदाराकडूनच तारखंड टाकून घ्यावेत
– घरातील विद्युत उपकरणांचे तारखंड तपासून घ्या
– वीजमापक केबिनमध्ये पाण्याची गळती होऊ नये यासाठी काळजी घ्या
– वीजमापकावर पाण्याची गळती होत असल्यास घरातील विजेचा मुख्य स्वीच बंद करा
– त्रुटी दूर झाल्याशिवाय स्वीच सुरू करू नये

हे करू नये
– वीजमापकाच्या केबिनमध्ये पाणी गळत असल्यास संच मांडणीला स्पर्श करू नये
– विजेची ठिणगी पडत असल्यास रस्त्यावरील दिव्याच्या खांबांना, लाल रंगाच्या डिस्ट्रिब्युशन पिलर्स व केबिनमधील वीजमापकांना हात लावू नये
– तात्पुरता विद्युतपुरवठा करण्यात आलेल्या इमारती, सदनिकांमधील रहिवाशांनी केवळ अत्यावश्यक उपकरणांचा वापर करावा

तक्रारीसाठी येथे संपर्क साधावा
– कुलाबा    २२१८४२४२
– ताडदेव    २३०९४२४२
– मस्जिद    २३४७४२४२
–  दादर    २४१२४२४२
– माहीम    २४४४४२४२
– वरळी     २४९५४२४२
– सुपारीबाग    २४११४२४२

Story img Loader