क्रिकेटचा महानायक सचिन तेंडुलकर याची क्रिकेटविश्वातील अखेरची खेळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे टोकदार आंदोलन या दोन घटनांमुळे कोल्हापूरकरांचे लक्ष शुक्रवारी मुंबई व कराडकडे लागले होते. सचिनच्या खेळाने समाधान दिले तरी त्याचे शतक न झाल्याने निराशा झाली. तर खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनात सायंकाळपर्यंत निर्णय होत नसल्याने कोल्हापूरकरांची घालमेल झाली.
कोल्हापूरकरांचा सचिन तेंडुलकर हा आवडता खेळाडू आहे. त्याच्या अखेरचा सामना पाहण्यासाठी शेकडो कोल्हापूरकर वानखेडे स्टेडियमवर गेले आहेत. सचिनच्या अखेरच्या कसोटीत सामन्यात काल पहिल्या दिवशी तो नाबाद होता. आज त्याच्याकडून अखेरच्या सामन्यात शतकी खेळीची अपेक्षा क्रिकेटरसिकांसह सामान्यांनाही लागली होती. आज दुस-या दिवशीचा खेळ सुरू झाल्यावर सचिनने अर्धशतक पूर्ण केल्यावर कोल्हापूरकरांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. त्यानंतर त्यांच्या नजरा त्याच्या शतकाकडे लागल्या होत्या. जसजशी सचिनची धावसंख्या वाढू लागली तशी शहरातील व्यवहारही बंद होत गेले. मात्र सचिन ७४ वर असताना बाद झाल्याने सर्वानाच अपार दु:ख झाले. त्यानंतर दिवसभर सचिनच्या झुंजार व शतक न झालेल्या खेळीची चर्चा होत राहिली.
गेल्या महिन्याभरापासून जिल्हय़ातील ऊस उत्पादक शेतक-यांना ऊस आंदोलनातून नेमके काय निष्पन्न होणार याचे वेध लागले होते. आज कराड येथे खासदार राजू शेट्टी यांचे आंदोलन होणार असल्याने त्यातून आगामी दिशा स्पष्ट होईल, अशी अपेक्षा सर्वानाच होती. त्यामुळे दिवसभर शेतक-यांसह करवीरकर कराड येथील घडामोडीचा आढावा घेत होते. तेथील घडामोडींवर त्यांची बारीक नजर लागली होती. जिल्हय़ातून हजारो शेतकरीही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी स्थानिक लोक भ्रमणध्वनीवरून माहिती घेत होते. तथापि तेथेही ठोस निर्णय न झाल्याने सर्वाचीच घालमेल वाढली होती. शुक्रवारचा दिवस कोल्हापूरकरांनी मुंबई व कराड येथील घटनांकडे लक्ष देत घालविला.