कुणी धार्मिक यात्रेवरून परतला असेल, कुणाच्या राहणीमानात बदल झालेला असेल, अगदी कुणी परदेशी भाषा शिकत असेल, कुणी संवेदनशील स्थळांवर घुटमळत असेल तर सावधान. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी सेलची त्यांच्यावर खास नजर आहे. दहशतवाद्यांची योजना हाणून पाडण्यासाठी मुंबई पोलिसांचा दहशतवाद विरोधी सेल सक्रीय झाला आहे. त्यामुळेच या सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवायांची अगदी पाळेमुळे शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती हाती आली आहे.
दहशतवादी एखादे ‘मिशन’ पूर्ण करण्याच्या खूप आधीपासून सक्रीय होतात. तरुणांना तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे सुरू असते. एखाद्या हल्ल्याविरोधात लढण्यासाठी यंत्रणा आहे. पण दहशतवादी कृत्यापूर्वी ज्या अगदी प्राथमिक हालचाली सुरू असताना त्या शोधण्याची कुठलीच यंत्रणा पोलिसांकडे नव्हती. त्यासाठीच सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी सेल (एटीसी) उघडला होता. या सेलमध्ये पाचशेहून अधिक प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. दहशतवादी हालचालींबाबतची अगदी लहानसहान माहिती मिळवण्याचे काम हे सेल सध्या करत आहेत. दहशतवादी बनण्यापूर्वीची काय प्राथमिक तयारी असते ते सुद्धा शोधून काढण्यात येत आहे. त्यानुसार कुणी धार्मिक यात्रेवरून परतलेला असेल, कुणी भडकाऊ धार्मिक भाषणे करत असेल, कुणाकडे अचानक पैसा आलेला असेल, कुणी परदेशी भाषा शिकत असेल, कुणाला लष्करी प्रशिक्षणाचे ज्ञान असेल, कुणी रसायने, किरणोत्साराने जखमी असेल, कुणी जर धार्मिक उत्सवात शक्तिप्रदर्शन करत असेल तर त्यावर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय संवेदनशील ठिकाणी घुटमळणारे, आपत्कालीन यंत्रणांची क्षमता तपासण्यासाठी पोलीस, अग्निशमन यांना दूरध्वनी करून बोलावणारे, मर्मस्थळे, संवेदनशील ठिकाणांची छायाचित्रे तपासणारे आदींची तपासणी केली जात आहे. याशिवाय हरवलेल्या व्यक्तींची यादी तपासणे, धार्मिक नेत्यांना तुरुंगात भेटणारे आदींवरही लक्ष ठेवले जात आहे. या पथकाला पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजातून वगळले गेले आहे. त्यामुळे गुप्तचर विभागाप्रमाणे त्यांच्याकडूनही महत्त्वपूर्ण माहिती मिळू लागली आहे.
याबाबत विचारले असता सहपोलीस आयुक्त दाते यांनी सांगितले की ही एक अभिनव योजना आहे. हा सेल अगदी खोलवर आणि प्राथमिक स्तरावरील माहिती गोळा करत आहे. अदृश्य स्वरूपात ज्या दहशतवादी कारवाया सुरू असतात यावर नजर ठेवण्याचे काम हा सेल करत आहे. दहशतवादी कृत्यांत अनेक घटकांचा समावेश असतो. हा सेलतर्फे त्या प्रत्येक घटकाचा, दहशतवादासाठी तयार केल्या जाणाऱ्या वातावरणाचा शोध घेतला जात आहे. येणाऱ्या काळात गुप्तचर यंत्रणेप्रमाणे मुंबई पोलीसही आगाऊ सूचना देऊन यंत्रणेला सावध करू शकणार आहेत.
दहशतवादी हल्ल्यापूर्वीच्या हालचालींवरही पोलिसांचे लक्ष
कुणी धार्मिक यात्रेवरून परतला असेल, कुणाच्या राहणीमानात बदल झालेला असेल, अगदी कुणी परदेशी भाषा शिकत असेल, कुणी संवेदनशील स्थळांवर घुटमळत असेल तर सावधान
First published on: 20-09-2013 at 06:01 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attention of police on movement of terrorist before attack