दारूगोळा कारखान्याची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी वचनबद्ध असून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुणवत्तेकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन अंबाझरी दारूगोळा कारखान्याचे महाव्यवस्थापक ए.के. प्रभाकर यांनी केले.
अंबाझरी दारूगोळा कारखान्यात नोव्हेंबर हा गुणवत्ता महिना म्हणून पाळला जात आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रभाकर बोलत होते. यावेळी कारखान्याच्या गुणवत्ता धोरणाची माहिती त्यांनी दिली. दारूगोळा कारखान्यात गुणवत्ता प्रशिक्षण, विविध विषयांवर स्पर्धा, विक्रेते व ग्राहकांचे संमेलन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दारूगोळा निर्मितीसाठी उच्चस्तरीय विश्वसनीयता आवश्यक आहे, असे वरिष्ठ गुणवत्ता अधिकारी कर्नल एस.डी. चौधरी म्हणाले.  अंबाझरी दारूगोळा कारखाना गेल्या तीन वर्षांपासून पुरवठा करीत असलेल्या उत्पादनात कोणतेही दोष आढळले नाही, असा अहवाल भारतीय वायुसेनेने दिला आहे, अशी माहिती ग्रुप कॅप्टन शेखर यांनी दिली. कार्यक्रमाला वरिष्ठ महाव्यवस्थापक आर.एस. झा, अविनाश चंद्र, वरिष्ठ संचालक एम.पी. शर्मा, अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संयुक्त महाव्यवस्थापक ए.बी. हांडे यांनी केले.   

Story img Loader