प्रत्येकाच्या जेवणातील प्रमुख घटक म्हणजे भात. भात नसल्यास जेवण परिपूर्ण होत नाही. यामुळे भातासाठी आवश्यक असणारी तांदुळ खरेदीही प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार करतो. उच्चभ्रु कुटूंबे बासमती सारखा महागडा तांदूळ वापरतात तर मध्यवर्गीय कुटूंबे आपल्या ऐपतीनुसार इतर वाणांच्या तांदळाची खरेदी करतात. परंतु, सध्या घोटी सारख्या तांदळाच्या प्रमुख बाजारपेठेत सुगंधी पावडरची भेसळ तांदळात करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार पुढे आला आहे. या भेसळीबाबत अन्न व औषध प्रशासनही अनभिज्ञ असल्याने ग्राहकांना कोणी वाली नसल्याचे चित्र आहे.
भाताचे आगार असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात भातापासून तांदूळ निर्मितीसाठी घोटी या मध्यवर्ती ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गिरण्या आहेत. तालुक्यातील शेतक ऱ्यांचा अधिक उत्पादन असणाऱ्या संकरीत भात बियाणाच्या लागवडीकडे अधिक कल असतो. त्यातच, प्रती बासमती समजल्या जाणाऱ्या इंद्रायणी नामक वाण दहा वर्षांपूर्वी तालुक्यात दाखल झाले. प्रचंड सुगंध व भरघोस उत्पन्न, यामुळे या तांदळाला सर्व ठिकाणाहून मागणी वाढली. तालुक्यातील पिकाचे लागवड क्षेत्रही वाढले. मागील दोन वर्षांच्या कालखंडात तालुक्यात होणारा बेमोसमी पाऊस व अतिवृष्टी यामुळे हाताशी आलेले पिकाचे नुकसान झाल्यामुळे भाताचे उत्पादन कमी झाले आहे.
उत्पादन कमी झाले असले तरी मागणी तेवढीच आहे. याचा फायदा घेत येथील तांदळाच्या बाजारपेठेत साध्या व हलक्या प्रतीच्या तांदळात सुगंधीत रासायनिक पावडर भेसळ करून इंद्रायणी तांदळाच्या नावाखाली विक्री करण्याचे प्रकार सर्रासपणे होत असल्याचे दिसत आहे. सुगंधासाठी भेसळ केली जाणारी पावडर धोकादायक नसल्याचा दावा तांदूळ उत्पादक करीत असले तरी साध्या तांदळाची इंद्रायणीच्या नावाखाली विक्री करून फसवणुकीचा प्रकार कित्येक वर्षांपासून बिनदिक्कतपणे सुरू आहे.
दरम्यान, दिल्लीच्या नोएडामधील औद्योगिक वसाहतीत या सुगंधी पावडरची निर्मिती केली जाते. ही पावडर तांदळाच्या एका मोठय़ा ढिगात एकजीव केली जाते. हा कृत्रिम सुगंधित तांदूळ विक्रीसाठी बाहेर पाठविला जातो. घोटी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय बोथरा यांनीही सुगंधी पावडर काही प्रमाणात तांदळात टाकण्यास अन्न व औषध प्रशासनाची परवानगी असल्याचा सांगितले. ही पावडर घातक नसल्याचे अनेक घाऊक विक्रेत्यांचे मत आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारीही अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. कारण, गेल्या काही वर्षांपासून खुलेआमपणे चाललेल्या या कारभाराकडे संबंधित विभागाचे लक्ष नाही. घाऊक व्यापारी भेसळ करत असलेल्या पावडरला खरोखरच मान्यता आहे की नाही, याविषयी स्पष्टता नाही. असे असूनही या विभागाने आजतागायत या भेसळीविरुद्ध कारवाई केलेली नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.
कसा ओळखाल कुत्रिम सुगंधित तांदुळ
ज्या तांदळात सुगंधी पावडर भेसळ करण्यात आली आहे, तो लगेच ओळखता येऊ शकतो. हा तांदूळ पाण्यात टाकल्यास अथवा धुवून काढल्यास तांदळाचा सुगंध गायब होतो. तसेच उन्हात वाळत टाकल्यानंतरही काही तासात त्याचा सुगंध नष्ट होतो, असे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा