कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे प्रतिपादन
‘पद्मभूषण’ पासून ‘महाराष्ट्रभूषण’पर्यंत अनेक पुरस्कार लाभले असले तरी ठाणेकर रसिकांनी कवितांना दिलेली भरभरून दाद हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च पुरस्कार असल्याचे प्रतिपादन कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ठाण्यात केले. ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी कथासंग्रह, काव्यसंग्रह आणि एका ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
‘शारदा प्रकाशन’च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या कवी राजेश अधटराव यांच्या ‘काव्यगाथा शिवरायांची’, ‘अभंग दासगणेशाचे’ या दोन काव्यसंग्रहाचे, कवयित्री पद्मजा शुक्ल यांच्या ‘मानसकन्या’ कथासंग्रहाचे, ‘अक्षरलेणं’ या काव्यसंग्रहाचे तसेच ‘महाराष्ट्रभूषण’ या ग्रंथाचे प्रकाशन कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते आणि कवी अशोक बागवे यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी पाडगावकरांनी रसिकांशी संवाद साधला. भाषण करण्यापेक्षा आपण कविता सादर करतो. कारण भाषणातही आशय आहे आणि कवितेतही आशय आहे.
आंबट तोंड करून स्वत:ला आध्यात्मिक समजणाऱ्या व्यक्तीसमोर कविता सादर करण्यापेक्षा रसिक मनाच्या श्रोत्यांसमोर कविता सादर करायला मला आवडते. प्रत्येक कार्यक्रमात मी ठाणेकरांची रसिकता अनुभवतो, असेही त्यांनी सांगितले.  
या वेळी पाडगावकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम असत’, आणि ‘यांचं असं का होतं कळत नाही,’ या दोन कविता आपल्या खास शैलीत सादर केल्या. त्यांच्या कवितांना रसिकांनी उभे राहून उत्स्फूर्त दाद दिली. या वेळी कवी राजेश अधटराव यांच्या ध्वनिफितीचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.

Story img Loader