पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असली, तरी पावसामुळे शहरातील सर्वच रस्त्यांची लहान-मोठय़ा खड्डय़ांनी चाळणी करून टाकली आहे. खड्डे चुकवताना वाहनधारकांची चांगलीच त्रेधा उडत आहे. खड्डय़ांमधून वाहन गेल्यास चालकांची व प्रवाशांची हाडेही खिळखिळी होत आहेत. खड्डय़ांमुळे रस्त्यांच्या कामाचे पितळही उघडे पडले आहे.
यंदा पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य तयार झाले आहे. रस्त्यात खड्डे की खड्डय़ांत रस्ते असा प्रश्न पडावा, असे चित्र शहरभर आहे. खड्डे चुकवत जाताना पादचाऱ्यांसह सर्वाचाच जीव मेटाकुटीला येत आहे. रात्रीच्या वेळी व दिवसाही अंदाज न आल्याने लहान-मोठे अपघातही या खड्डय़ांमुळे घडत आहेत. अपघातात वाहनधारक जखमी होत असले, तरी या प्रकारांकडे व खड्डय़ांकडेही महापालिका प्रशासनासह सर्वच संबंधित विभागांचे जाणीवपूर्वक दुर्लक्षच होत असल्याचे दिसते.
दरम्यान, महापालिका आयुक्त वातानुकूलित मोटारीतून फिरत असल्यामुळे त्यांना रस्त्यातल्या खड्डय़ांची जाणीव होत नाही. ती त्यांना करून देण्यासाठी आयुक्तांनाच शहरातील रस्त्यांवरून दुचाकीवरून फिरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात याची माहिती देण्यात आली. सोमवारी (दि. २९) दुपारी ४ वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे हे स्वत: आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना शहरातील रस्त्यांवर दुचाकीने फिरण्याचे आमंत्रण देणार आहेत. रस्त्यावरील खड्डय़ांचा अनुभव व ‘आनंद’ आयुक्तांनी घ्यावा, असे आवाहन पक्षाचे प्रदेश चिटणीस मिलिंद पाटील यांनी केले आहे. मंगळवारी सकाळी ११ ते १ या वेळेत आयुक्तांनी दुचाकीवरून शहरात फेरफटका मारावा, अशी विनंती राष्ट्रवादीतर्फे करण्यात येणार आहे. या वेळी पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्याबरोबर उपस्थित राहतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले.

Story img Loader