बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ८५.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा पहिला, तर औरंगाबाद विभागाचा द्वितीय क्रमांक असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष पी. एस. पठारे यांनी सांगितले. याही वर्षी मुलींनी उत्तीर्णतेत आघाडी घेतली. मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ५.४९ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत पहिल्यांदाच उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.
या वर्षी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली या पाच जिल्हय़ांतून ९६ हजार ८६ विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यातील ८१ हजार ९२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ३४ हजार ५०० मुलींपैकी ३० हजार ६२९ मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.७८ टक्के आहे, तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८३.२९ टक्के आहे. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी १७८ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. तर त्यातील एक विद्यार्थी तोतया असल्याचे परीक्षेच्या वेळी लक्षात आले. त्या विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करून पुढील पाच वर्षे परीक्षेस बसण्यापासून प्रतिबंध करण्यात आला आहे. तर ९ प्रकरणांची चौकशी अजूनही चालू आहे. गेल्या तीन वर्षांत कॉपीचे प्रमाण कमी झाल्याचा दावाही पठारे यांनी केला. २००९ मध्ये ६६२ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले होते. २०१० मध्ये ९१८, २०११ मध्ये ९२५ विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडण्यात आले. २०१२ मध्ये महसूल व अन्य यंत्रणांनी कॉपीमुक्तीचे आंदोलन हाती घेतले. या वर्षी हे प्रमाण ०.१६ टक्के एवढेच आहे.
परीक्षेस पुन्हा बसणाऱ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण २९.२६ टक्के आहे. विभागात बीड जिल्हय़ाचा निकाल सर्वाधिक म्हणजे ८८.४४ टक्के एवढा आहे. परभणी-८६.९२, जालना-८०.६६, हिंगोली-८३.९९ तर औरंगाबाद जिल्हय़ातील ८३.९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मार्च २००४ पासून ऑनलाइन परीक्षा घेण्याची पद्धत सुरू करण्यात आली असून, इयत्ता बारावीच्या माहिती व तंत्रज्ञान या विषयात १५५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी १५४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. हे प्रमाण ९८.८९ टक्के एवढे आहे.
उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे अनिवार्य आहे. ही प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनाच्या पद्धतीचा अवलंब करून शुल्क भरावे, असे आवाहनही पठारे यांनी केले आहे.
बारावीच्या निकालात औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर
बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत औरंगाबाद विभागातील ८५.२६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाचा पहिला, तर औरंगाबाद विभागाचा द्वितीय क्रमांक असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रभारी विभागीय अध्यक्ष पी. एस. पठारे यांनी सांगितले.
First published on: 31-05-2013 at 01:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aurangabad division on second in hsc result