महापालिकेच्या आर्थिक चणचणीवर वसुलीचा उतारा शोधत दोन दिवसांत ४६ लाख ३३१ रुपये अधिकाऱ्यांनी गंगाजळीत जमा केले. कर बुडविणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन व मोबाईल टॉवरची थकीत वसुली केल्याची माहिती सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील ४४ मोबाईल टॉवरच्या मालमत्ता करापोटी ४२ लाख वसुली करण्यात आली, तर शहरात चुकीचा पत्ता देऊन कर बुडविणाऱ्यांवरही वसुली अधिकाऱ्यांनी सोमवारी छापे टाकले.
स्थानिक संस्था कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली असून, शहरात आणलेल्या मालाचा कर भरला आहे की नाही, हे तपासले जात आहे. चुकीचा पत्ता दाखवून कर बुडविण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. आज त्याच्या विरोधात महापालिका उपायुक्तांनी विशेष मोहीम सुरू केली. शहरातील यमुनानगर येथे शिवम इंडस्ट्री येथून भिवंडी येथील अ‍ॅसेटिक मार्केटिंग प्रा. लि. या चुकीच्या नावावर देयक तयार करण्यात आले. मालमोटारीतून प्लायवूड भरलेला माल शहरातच उतरविणार असल्याची बातमी वसुली पथकातील अधिकाऱ्यांना कळल्यानंतर अधिकाऱ्यांनी छापा टाकून स्थानिक कर बुडविणाऱ्यांकडून दहापट करवसुली केली. देयकावर किंमत कमी दाखविण्यात आली होती. ४ लाख १३ हजार ७४ रुपयांचे प्लायवूड केवळ १ लाख ६१ हजार २०८ रुपये किमतीचे असल्याचे नोंदविण्यात आले होते. प्लायवूडचे बाजारमूल्य ४ लाख १३ हजार एवढे असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक कर ३.५० टक्के दराने आकारण्यात आला. कर बुडविल्याबद्दल १ लाख ४४ हजार ५८० रुपये दंड ठोठावण्यात आला. भाग्यलक्ष्मी एंटरप्रायझेस याने ३४० बॅग सिमेंट कर न भरता आणले होते. त्यांच्याकडून दहापटीने दंड वसूल करत गंगाजळीत २७ हजार २६९ रुपये भरण्यात आले. फर्निस ऑइलचा कर बुडविणाऱ्या वेनथर्प कंपनीकडून ५७ हजार २४ रुपये वसूल करण्यात आले.
स्थानिक कर न भरणाऱ्या आणि चुकविणाऱ्यांकडून दंड आकारण्यात येत आहे. तसेच मोबाईल टॉवरचा मालमत्ता कर न भरणारे ४४ टॉवर सील करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती. मात्र, रविवार व सोमवारी ४४ लाख रुपये वसुली करण्यात आली.

Story img Loader