रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्याआदेशाला केराची टोपली दाखवत पर्यटनाच्या राजधानीला डावलून सुट्टीच्या काळातील विशेष रेल्वे नांदेड-अकोला मार्गे सोडण्याचा शहाजोगपणा अधिकाऱ्यांनी केला. साहजिकच आश्वासन व आदेश एकीकडे आणि प्रत्यक्ष कार्यवाही मात्र भलतीच असा आडमार्ग रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
नांदेड-औरंगाबाद-मनमाड-खंडवा-नवी दिल्ली-अमृतसर-जम्मूतावी (कटरा) ही विशेष हॉलिडे रेल्वे १० एप्रिल ते ३१ जुलैदरम्यान सोडण्यात यावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना औरंगाबाद भेटीदरम्यान करण्यात आली होती. मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा तसेच सुधाकर चव्हाण, मनसुख झांबड आदींच्या शिष्टमंडळाने औरंगाबाद भेटीवर आलेल्या रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांची विमानतळावर भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले होते. या मागणीची तातडीने दखल घेत बन्सल यांनी दक्षिण-मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस. एस. सोईन यांना ही रेल्वे त्वरित सुरू करण्याचा आदेश दिला होता. परंतु मंत्र्यांचा आदेश डावलून दक्षिण-मध्य रेल्वेने महाराष्ट्राची पर्यटनाची राजधानी अर्थात औरंगाबादला डावलून नांदेड-अकोला मार्गे येत्या २१ एप्रिलपासून ही रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीही १ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबरदरम्यान अकोला-नांदेड मार्गेच ही रेल्वे सोडण्यात आली होती. त्यावेळीही रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे तत्परतेने लक्ष वेधत ही रेल्वे (कटरा) जम्मूतावी-दिल्ली-मनमाड-औरंगाबाद-जालना-परभणी या मार्गे नेण्याची विनंती करण्यात आली होती. परंतु त्यावेळीही या मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा तीच खेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी खेळली आहे.
लातूर-मुंबई गाडी नांदेडपर्यंत नेण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे, परंतु आता नांदेड-संत्रागच्छी व पूर्णा-पाटना रेल्वेचा विस्तारही औरंगाबादपर्यंत करण्याचा आदेश दक्षिण-मध्य रेल्वेला द्यावा. याबरोबरच सिकंदराबाद-जयपूर रेल्वे आठवडय़ातून एकदा नांदेड-औरंगाबाद-मनमाड या मार्गे न्यावी, अशी मागणी वर्मा यांनी शनिवारी रेल्वेमंत्र्यांना फॅक्सद्वारे निवेदन पाठवून केली. या संदर्भात मंगळवारी (दि. १६) रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेऊन लक्ष वेधणार असल्याचे वर्मा यांनी या संदर्भात बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा