हिंदी सिनेमाचा फॉर्म्यूला थोडासा बदलत चाललाय हे गेल्या काही काळात दिसून आले आहे. काही चित्रपटांचा आशय, विषयावरून तसे म्हणण्याचे धाडस करता येते. ‘औरंगजेब’ हाही काहीसा त्याच पठडीतला चित्रपट. तद्दन बॉलीवूड गल्लाभरू चित्रपटांपैकीच एक असला तरी नवोदितांपासून प्रस्थापित कलावंतांपर्यंत सर्वाचाच उत्तम अभिनय हे या चित्रपटाचे बलस्थान आहे. गुन्हेगारी-बिल्डर-भ्रष्टाचार या विषयावर हा चित्रपट बेतला असून मानवी स्वभावाचे अनेक पदर खुबीने उलगडून दाखविताना कथानकाची सुंदर गुंफण घातल्याने एका उंचीवर चित्रपट नेऊन ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरलाय. बॉलीवूड फॉर्म्यूला असूनही अनेक फॉम्र्यूलांचा खुबीने वापर कथानकात करण्यात आला आहे. परंतु गुंतागुंतीच्या अनेक गोष्टींमुळे प्रेक्षक गोंधळात पडतो. परंतु कलावंतांच्या अभिनयाने हा गोंधळ काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. ‘त्रिशूल’मधील काही कथानकाचा संदर्भ चित्रपटाला लावता येईल. नायक-नायिकेची चुंबनदृश्ये, अ‍ॅक्शन दृश्ये, गाणी असा मसाला वापरून गुंतागुंतीचे कथानक प्रेक्षकांचे बऱ्यापैकी मनोरंजन करते.
दोन समांतर गोष्टी यात आहेत. एक आहे ती एसीपी आर्यची. आर्य (पृथ्वीराज सुकुमारन) हा पोलीस अधिकारी आपल्या दिवंगत वडिलांवर लागलेला कलंक पुसण्यासाठी धडपडणारा. आणि दुसरी गोष्ट आहे विशाल व अजय (दुहेरी भूमिकेतली अर्जुन कपूर) आणि त्यांचा गँगस्टर बाप यशवर्धन (जॅकी श्रॉफ) व त्यांची आई वीरा (तन्वी आझमी) यांची. आर्य वडिलांवरील कलंक पुसण्यासाठी रविकांत काकांची (ऋषी कपूर) मदत घेऊन वरवर बिल्डर, परंतु खरा गँगस्टर माफिया असलेल्या यशवर्धनला नामोहरम करण्याचा प्रयत्न करतो. तर सुरुवातीला आपल्या वडिलांच्या विरोधात उभा ठाकलेला आणि वडिलांचा सूड घेण्यासाठी तयार असलेला विशाल नंतर मात्र यशवर्धनच्या मदतीला धावून जातो आणि कथानकात अनेक पेच निर्माण होतात. बॉलीवूड मसाला असल्यामुळे शेवट काय होणार हे चित्रपट कथन करतो. पण तरीसुद्धा चित्रपट पकड घेतो. दिग्दर्शक प्रेक्षकाला खिळवून ठेवण्यात चांगल्यापैकी यशस्वी झालाय.
दोन ‘बिछडलेले’ भाऊ अंतिमत: वडिलांना वाचविण्यासाठी एकत्र येतात, काटय़ाने काटा काढायचा प्रयत्न करण्यासाठी दोन खलनायक एकत्र येतात वगैरे ठरीव फॉर्म्यूलाचा चांगला वापर दिग्दर्शकाने यात केला आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक एकच आहे. तरीसुद्धा पटकथा-संवादलेखन हे दिग्दर्शकीय शैलीपेक्षा वरचढ ठरले आहे.
गोष्ट गुंतागुंतीची असली तरी सर्वच कलावंतांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचिवण्यात लेखक यशस्वी झालाय. ‘इशकजादे’च्या यशानंतर आलेला अर्जुन कपूरचा यशराजचा दुसरा चित्रपट असून कारकीर्दीच्या सुरुवातीलाच त्याला दुहेरी भूमिका साकारण्याची संधी मिळालीय आणि त्याने आपली चमक दाखवली आहे. पैशाची मस्ती चढलेला आणि कोणतेही बेकायदेशीर काम करण्यास सरावलेला बेफिकीर अजय आणि आईचा एकुलता एक संस्कारक्षम मुलगा असलेला विशाल अशा दोन्ही भूमिकांमधील भेद अर्जुन कपूरने आपल्या अभिनयातून चांगल्या प्रकारे दाखविण्याचा प्रयत्न केलाय.
दुहेरी भूमिकांचे लेखन हेच खरे तर अभिनेत्याला पुरेपूर वाव देण्याच्या दृष्टीने लिहिले गेले आहे. त्या अर्थाने संपूर्ण चित्रपट पटकथा-संवादाचा प्रभाव दिग्दर्शकावर झाला आहे हेच दाखवितो. तरीसुद्धा आपल्या परीने भूमिका चांगली साकारण्याचा प्रयत्न सर्व प्रमुख कलावंतांनी केला आहे. ऋषी कपूरने ‘हम भी कुछ कम नही’ म्हणत तोडीस तोड अभिनय केला आहे.
दाक्षिणात्य पृथ्वीराज सुकुमारनने या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये नव्याने ‘इनिंग’ सुरू केलीय असेच म्हणावे लागेल. ‘अय्या’मधील भूमिकेद्वारे त्याने बॉलीवूड पदार्पण केले असले तरी त्यातील भूमिका त्याच्यातील ‘हिरो’ला वाव देणारी नव्हती.
मध्यांतरापर्यंत दुहेरी भूमिकांमधील जुगलबंदी पाहायला मिळणार असे वाटत असतानाच नंतर कथानकात कलाटणी देऊन चित्रपटाचे औत्सुक्य टिकवून ठेवले आहे. शेवटाकडे जाताना चित्रपट खूप धीमा होतो. इथे काही प्रमाणात संकलनाची कात्री चालवायला हरकत नव्हती. आजच्या काळातील भ्रष्टाचार-बिल्डर-पोलीस-व्यवस्था यांचे संगनमत, त्यातून अधिकाधिक पैसा वाट्टेल त्या मार्गाने मिळविण्यासाठी लागलेली अहमहमिका याचे दर्शन घडविण्यातही चित्रपट यशस्वी ठरतो.
यशराज फिल्म्स बॅनर
औरंगजेब
निर्माता – आदित्य चोप्रा
लेखक-दिग्दर्शक – अतुल सभरवाल
संगीत – अमर्त्य राहूत, विपीन मिश्रा
संकलन – नीरज वोरालिया
कलावंत – अर्जुन कपूर, ऋषी कपूर, पृथ्वीराज सुकुमारन, जॅकी श्रॉफ, दीप्ती नवल, तन्वी आझमी, सिकंदर खेर, अमृता सिंग, साशा आगा, सुमीत व्यास, रसिका दुग्गल, स्वरा भास्कर, कवी शास्त्री.
अतुल सभरवाल – लेखक – फिर मिलेंगे, डरना मना है, माय वाईफ्स मर्डर.

Story img Loader