साहित्यप्रेमींमध्ये चांगलाच प्रसिद्ध झालेला ज्योती स्टोअर्सचा ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रम सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) दंडेलशाहीमुळे अडचणीत आला आहे. सावानाच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याकरिता विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची मागणी घटनेतील तरतुदींनुसार सावानाच्या ६१ सभासदांनी संस्थेच्या अध्यक्षांकडे केली असल्याची माहिती वाचनालयाचे आजीव सभासद प्रमोद दीक्षित व हेमंत देवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
ज्योती स्टोअर्सच्या वतीने १९७८ पासून सार्वजनिक वाचनालयाच्या दस्तूर सभागृहात पुस्तक प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या प्रदर्शनात वैविध्यपूर्ण पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचकांचा प्रतिसाद दरवर्षी मिळत असतो. या वर्षी या उपक्रमांतर्गत कोण कोण सहभागी होणार आहे, याविषयी ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी या वर्षी आपणास पुस्तक प्रदर्शनासाठी दस्तूर सभागृह देता येणार नाही असे लेखी पत्र कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
संस्थेची निवडणूक स्वत:च्या आधिपत्याखाली घेण्याच्या साहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध काही सभासदांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही याचिका आता अंतिम निकालाच्या टप्प्यात आहे. या याचिकेतून आपण माघार घेतली तरच आपणास प्रदर्शनासाठी सभागृह उपलब्ध करून दिले जाईल अन्यथा नाही, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याचे खैरनार यांचे म्हणणे आहे. वास्तविक एखाद्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा घटनादत्त अधिकार नागरिकांना आहे. या अधिकाराचा वापर केला म्हणून त्या व्यक्तीची व्यावसायिक कोंडी करायची ही संस्थेच्या कार्यकारी मंडळाची कृती बेकायदेशीर, घटनाविरोधी आणि अन्याय करणारी आहे. या पाश्र्वभूमीवर यंदा पुस्तक प्रदर्शनासाठी सभागृह नाकारणे हा संस्थेच्या कार्यकारी मंडळाने घेतलेला निर्णय सर्वावरच अन्याय करणारा आहे. त्यामुळे या विषयाबाबत विचार-विनिमय करण्याकरिता संस्थेच्या सभासदांची विशेष सभा १५ दिवसांच्या आत बोलवावी अशी विनंती ६१ सभासदांनी संस्थेचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पुस्तक देवघेव विभागाची वेळ पूर्ववत करण्याची मागणी
सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाने सूत्रे हाती घेतल्यानंतर वाचनालय सकाळी आठ ते सायंकाळी आठ असे सलग १२ तास खुले राहील, असे घोषित केले होते. ज्येष्ठ नागरिकांना या बदलामुळे उन्हाचा त्रास सहन करीत पुस्तक बदलण्यास यावे लागत आहे. पूर्वीप्रमाणेच सकाळी आठ ते १२ आणि दुपारी चार ते आठ हीच वेळ सभासदांना सोयीची आहे. त्यामुळे या विषयावरही सभेत चर्चा होण्याची गरज निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. मार्च २०१२ पासून संस्थेत नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आल्यानंतर सभासद होऊ इच्छिणाऱ्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना सभासदत्वासाठीचा छापील अर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या असंख्य तक्रारी असल्याचे दीक्षित-देवरे यांनी सांगितले आहे.
अग्निप्रतिबंधक यंत्रणेची गरज
वाचनालयाच्या इमारतीमध्ये सुमारे पावणेदोन लाख पुस्तके आहेत. इमारतीमध्ये दुर्मीळ वस्तूंचा समावेश असलेले वस्तुसंग्रहालयदेखील आहे. संस्थेच्या मालकीचे प. सा. नाटय़गृह असून तेथे अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्याची गरजही दीक्षित व देवरे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा