कामगार संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या दुसऱ्या दिवशी अधिकृत संप बारावी परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर अनधिकृतपणे संपला. बँका, विमा कंपन्या, पोस्ट, बीएसएनएल कार्यालयांसह विविध कंपन्यांमध्ये बंद असला, तरी पीएमपी, राज्य मार्ग परिवहन (एसटी), रिक्षा या सेवा सुरळीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना निर्विघ्नपणे परीक्षेला सामोरे जाता आले. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढला होता.
कामगार संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या दुसऱ्या दिवशी विविध क्षेत्रांवर फारसा परिणाम दिसला नाही. शिवजयंती आणि त्यापाठोपाठ दोन दिवसांचा संप यामुळे बँकांचे व्यवहार ठप्प झाले. व्यापारी आणि रोखीचे व्यवहार करणाऱ्या उद्योगांना त्याचा फटका बसला. मात्र, दोन दिवस बँका बंद राहणार याची पूर्वकल्पना असलेल्या नागरिकांनी ‘एटीएम’द्वारे दोन दिवसांच्या खर्चाची तजवीज करून ठेवली होती. रिक्षा पंचायत आजच्या बंदमध्ये सहभागी नसल्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वीच पोहोचणे शक्य झाले. पीएमपी आणि राज्य मार्ग परिवहन याबरोबरच रिक्षा या सेवा सुरळीत झाल्यामुळे शहरातील नागरिकांबरोबरच परगावहून येणाऱ्या पाहुण्यांची सोय झाली. दोन दिवसांच्या संपामध्ये औद्योगिक क्षेत्र सहभागी असल्याची घोषणा झाली होती. मात्र, गुरुवार ही औद्योगिक सुटी असल्याने संपाला पाठिंबा ही केवळ औपचारिकताच ठरली. पोस्ट कार्यालये बंद असल्याने टपाल वितरणाचे काम होऊ शकले नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा