‘ऑटिझम’ग्रस्त आदित्य पराडकर या विद्यार्थ्यांने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवून अशा मुलांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे तसेच ऑटिझमग्रस्त मुले अभ्यासात फारशी प्रगती करू शकत नाहीत, या समजालाही छेद दिला आहे. आदित्यला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ७२ टक्के गुण मिळाले होते. मराठी, हिंदूी, इंग्रजी, इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र असे विषय घेऊन आदित्यने १२ वीच्या परीक्षेत हे यश मिळविले आहे. आदित्य विरार येथील विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल महाविद्यालयात १२ वी कला शाखेत शिकत आहे. ऑटिझमग्रस्त मुले काही गोष्टी खूप चांगल्या करतात तर काही गोष्टी त्यांना अजिबात साधत नाहीत. त्यांचा भाषिक, बौध्दिक, शारिरीक आणि मानसिक विकास खूप संथ गतीने होतो. आजुबाजूच्या वातावरणाशीही ही मुले पटकन जुळवून घेऊ शकत नाहीत. ‘जेनेटिक डिसऑर्डर’मुळे आईच्या गर्भात असतानाच मेंदूतील काही दोषांमुळे हा विकार सोबत घेऊनच ही मुले जन्माला येतात. अशा मुलांना वाढविताना त्यांच्यावर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. असे मूल वाढविणे म्हणजे आई-वडील आणि घरातल्यांचीही कठोर परीक्षा असते. पण अशाही परिस्थितीत आदित्यचे वडील सुधीर आणि आई संध्या यांनी त्याच्यावर मेहनत घेतली आणि आदित्यला १२ वीच्या परीक्षेत मिळालेल्या यशामुळे अशी मुलेही काही करून दाखवू शकतात, हे सिद्ध झाले.
या संदर्भात ‘वृत्तान्त’शी बोलताना सुधीर पराडकर म्हणाले की, आदित्य दोन वर्षांचा असताना तो ऑटिझमग्रस्त असल्याचे आम्हाला कळले. हताश न होता किंवा खचून न जाता आहे त्या परिस्थितीला जिद्दीने सामोरे जायचे आम्ही ठरविले. आदित्यवर मेहनत घेऊन, त्याला सर्वसाधारण मुलाप्रमाणे वागवून, त्याच्यात शारीरिक, भाषिक, बौद्धिक आणि मानसिक कौशल्य विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आदित्यनेही या प्रयत्नांना चांगली साथ दिली. ऑटिझमग्रस्त मुलांवरही मेहनत घेतली आणि त्यांना प्रेरणा दिली तर ही मुलेही काहीतरी करून दाखवू शकतात, हा आत्मविश्वास आम्हाला आदित्यच्या रुपाने मिळाला. त्यामुळे अशा मुलांच्या आई-वडिलांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा स्वीकार करावा, असेही ते म्हणाले.बारावीसाठी आम्ही आदित्यला कोणताही शिकवणी वर्ग लावला नव्हता. त्याचा सगळा अभ्यास आम्ही घरी करून घेतला. बारावीनंतर एकतर पुढे तीन वर्षे शिकून बी.ए. ची पदवी मिळविणे किंवा ‘ट्रॅव्हल-टूरिझम’च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे असे पर्याय आहेत. ऑटिझमग्रस्त मुले सहसा समाजात फारशी मिसळत नाहीत. पण आदित्यने या समजुतीलाही छेद दिला आहे. त्याला समाजात मिसळायला, लोकांशी बोलायला आवडते. ‘इंटरमाऊंट अॅडव्हेंचर’ या संस्थेतर्फे तो नुकताच नैनिताल येथे गेला होता. तेथे त्याने रॅपलिंगही केल्याची माहिती सुधीर पराडकर यांनी दिली.
‘ऑटिझम’ग्रस्त आदित्यच्या जिद्दीची कहाणी!
‘ऑटिझम’ग्रस्त आदित्य पराडकर या विद्यार्थ्यांने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवून अशा मुलांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे
First published on: 18-06-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Autism survier aditya got 65 percent in hsc exam