रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे हाल सुरुच
मुजोर रिक्षा चालकांमुळे प्रवासी हैराण
आरटीओकडून कारवाईच्या नुसत्या बाता
मुजोर रिक्षा चालकांविरोधात कारवाईच्या बाता मारणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा भाडेवाढ होऊन २४ तास उलटूनही नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका कायम ठेवल्याने भाडे वाढताच ठाणेकर प्रवाशांचा मनस्तापही वाढल्याचे चित्र गुरुवारी आणि शुक्रवारी कायम होते. सायंकाळी घरी परतताना भाडे नाकारणे, थांब्याचे नियम मोडणे, प्रवाशांसोबत पैशावरुन हुज्जत घालणे असे प्रकार नेहमीप्रमाणे सुरुच होते. भाडे वाढवताना मुजोर रिक्षा चालकांना वेसण घाला, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी देऊनही ठाणे परिवहन विभागाचे अधिकारी दिवसभर केवळ बैठका घेण्यात मश्गुल होते, असे चित्र दिसून आले. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कोठेही मोहीम सुरू झाल्याचे चित्र दिसले नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हालांना कुणी वाली नाही, असेच चित्र दिसत होते.
आरटीओ तसेच स्थानिक वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ठाण्यात रिक्षा चालकांची मनमानीने टोक गाठले असून रिक्षा वाहतुकीसंबंधी सर्वात बदनाम शहर असा शिक्का या शहरावर केव्हाच बसला आहे. प्रवाशांना नकार देणे, प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे, प्रवाशांसोबत हुज्जत घालणे, असभ्य वर्तवणूक अशा स्वरूपाच्या तक्रारी गेल्या काही वर्षांपासून वाहतूक पोलिसांकडे सातत्याने प्राप्त होत आहेत. अशा रिक्षा चालकांविरोधात कारवाई व्हावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून नेहमीच व्यक्त होत असते. स्थानिक वाहतूक पोलीस अधून-मधून कारवाई हाती घेतात, यापलीकडे फारसे काही होत नाही, असेच चित्र सध्या ठाणेकरांना दिसत आहे.रिक्षा भाडेवाढ होताच ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई सुरू होईल, अशी अपेक्षा प्रवाशी बाळगून होते. मात्र, गुरूवार आणि शुक्रवार असे दोन्ही दिवस आरटीओचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात बैठकांमध्ये मश्गुल असल्याने रिक्षा चालकांना वेसण बसेल, अशी कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तर नेहमीप्रमाणे रिक्षा चालकांच्या मनमानीशी झुंज देत प्रवासी इच्छित स्थळी पोहण्याचा प्रयत्न करत होते. रेल्वे स्थानकालगत असलेल्या सॅटीस पुलाखाली असलेल्या रिक्षा स्टॅण्डवर काही प्रमाणात शिस्तीचा कारभार आढळून येत होता. मात्र, गावदेवी मंदिरालगत असलेल्या अघोषित रिक्षा थांब्यावर चालकांनी मनमानी सुरुच होती. रेल्वे स्थानकाच्या पूर्वेलाही काही वेगळी परिस्थिती दिसत नव्हती. रेल्वे स्थानक परिसरातून वागळे, वर्तकनगर, समतानगर, लोकमान्यनगर, पवारनगर, लोकपुरम, घोडबंदर अशा लांबच्या पल्ला गाठू इच्छिणाऱ्या प्रवाशांचे हाल नेहमीप्रमाणे सुरू होते. दरम्यान, रिक्षाने प्रवास करताना भाडे नेमके किती झाले याची माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांना रिक्षा चालकांच्या दरपत्रकावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ठाणे आरटीओने मोफत हेल्पलाईन सुरू केली असून अशाप्रकारे देशातील ही पहिलीच हेल्पलाईन असल्याचा दावा करण्यात आला. अशा हेल्पलाईनमुळे रिक्षाभाडे किती झाले हे समजेल, मात्र रिक्षा पकडताना होणाऱ्या त्रासाचे काय, असा सवाल लक्ष्मीपार्क येथे रहाणारे सचिन साळुंखे यांनी उपस्थित केला. रिक्षा प्रवास महागताच भाडे नाकारणाऱ्या प्रवाशांविरोधात मोहीमा सुरू केल्या जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ठाण्यात मात्र रिक्षा चालकांची दादागिरी सुरुच आहे, असे वर्तकनगर भागातील हरमेश भतिजा या प्रवाशाने सांगितले. तर रेल्वे स्थानक परिसरात सायंकाळच्या वेळेत आरटीओ अधिकाऱ्यांनी गस्त घालावी, त्यांना मुजोर रिक्षा चालकांचे जथ्थे सापडतील, अशी प्रतिक्रिया लोकमान्यनगर भागातील धनश्री मोरे या तरुणीने दिली.
तक्रार हेल्पलाईन
आरटीओ – १८००२२५३३५
ठाणे वाहतूक पोलीस – ८२८६३००३०० / ८२८६४००४००
मनस्तापही वाढला
रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांचे हाल सुरुच मुजोर रिक्षा चालकांमुळे प्रवासी हैराण आरटीओकडून कारवाईच्या नुसत्या बाता मुजोर रिक्षा चालकांविरोधात कारवाईच्या बाता मारणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षा भाडेवाढ होऊन २४ तास उलटूनही नेहमीप्रमाणे बघ्याची भूमिका कायम ठेवल्याने भाडे वाढताच ठाणेकर प्रवाशांचा मनस्तापही वाढल्याचे चित्र गुरुवारी आणि शुक्रवारी कायम होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-10-2012 at 12:36 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto ricksha auto rto traffic police thane auto ricksha meter