डोंबिवली रेल्वे स्टेशन ते एमआयडीसीतील मिलापनगर, एम्स रूग्णालय, डीएनएसबी, अन्नपूर्णा, लोढा हेवन या प्रवासासाठी गुरूवारपासून भागिदारी पध्दतीने रिक्षेचे भाडे १४ रूपयांपासून ते ३८ रूपयांपर्यंत वाढल्याने संतापलेल्या प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे निदर्शने केली. या मार्गावर भाडे आकारणीवरुन रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये दिवसभर वाद सुरू होता. मात्र, स्थानिक आरटीओ अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नव्हते, असेच चित्र दिसून आले. शुक्रवारी सकाळी एमआयडीसीतील मॉडेल कॉलेज चौक परिसरात रिक्षा प्रवाशांनी उत्स्फूर्तपणे एकत्र जमून रिक्षा भाडे वाढीचा निषेध केला. भागीदार व शेअर रिक्षेचे भाडे कमी केले जात नाही तोपर्यंत कोणीही रिक्षेने प्रवास करू नये, असे आवाहन प्रवाशांना प्रवासी संघटनामार्फत करण्यात आले आहे.  दरम्यान, प्रवाशांचा उद्रेक लक्षात घेउन कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाने गुरुवारपासून या मार्गावर जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांनी बसमधून प्रवास करावा असे आवाहन एमआयडीसीतील नागरिकांनी केले आहे. एमआयडीसीतील मिलापनगर भागात गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी हस्तक्षेप केला नसता तर स्थानिक रहिवासी आणि रिक्षा चालक यांच्यात मोठा वाद निर्माण झाला असता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. मलापनगरमधील पहिल्या थांब्यासाठी १४ रूपये भागिदारी रिक्षेचे भाडे असताना चालक १७ रूपये भाडे वसूल करीत होते. अनेक प्रवाशांनी चालकांना जाब विचारला. मिलापनगर रेसिडेन्टड असोसिएशनचे सरचिटणीस राजू नलावडे यांनी प्रवाशांच्यावतीने चालकांना जाब विचारणा केली असता त्यांना चालकांनी घेराव घातला. शुक्रवारी सकाळी सात ते सकाळी दहा वाजेपर्यंत एमआयडीसीतून रेल्वे स्टेशनकडे येणाऱ्या प्रवाशांनी रिक्षांवर बहिष्कार टाकून आपल्या खासगी वाहने, केडीएमटीच्या बसने प्रवास केला. तीन तास भाडेच मिळाले नाही. त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये वाद सुरू होता. दहा ते बारा रूपये भागिदार पध्दतीने रिक्षेचे भाडे देण्याची सवय लागलेल्या डोंबिवलीकरांना दररोज प्रवासासाठी ३४ रूपये मोजणे शक्य होणार नाही. त्यामुळे असे वाद थोडेफोर होत जातील, असे रिक्षा संघटनेच्या नेत्यांनी सांगितले. प्रवासी आणि रिक्षा चालकांना एका व्यासपीठावर आणून हा प्रश्न आम्ही सामंजस्याने सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Story img Loader