कल्याण-डोंबिवली परिसरात ‘सीएनजी’ केंद्र नसल्याने रिक्षाचालकांना गॅस भरण्यासाठी नवी मुंबई किंवा भिवंडी येथे जावे लागते. या धकाधकीत रिक्षाचालकांना मोठा भरुदड पडत आहे. डोंबिवलीपासून ३५ किलोमीटर दूर गॅस भरण्यासाठी गेलेल्या रिक्षा शहरात वेळेत उपलब्ध होत नसल्याने संध्याकाळच्या वेळेत नागरिकांना घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीत. प्रवासी तासन् तास रांगेत उभे राहत असल्याचे चित्र रामनगर रिक्षा वाहनतळ, गांधीनगर रिक्षा वाहनतळांवर दररोज दिसत आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात सुमारे २५ हजार रिक्षा आहेत. बहुतांश रिक्षाचालकांनी रिक्षेला सीएनजी, एलपीजीचे किट बसवून घेतले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी ‘आरटीओ’कडून हे किट बसवणे चालकांवर बंधनकारक केले आहे. त्यामुळे शहरातील निम्म्याहून अधिक रिक्षा सीएनजीवर धावतात. कल्याण-डोंबिवली शहरात सीएनजी भरणा केंद्र नाही. ही केंद्रे नवी मुंबईतील महापे व भिवंडीजवळील कोन येथे आहेत. परिसरातील ही एकमेव केंद्रे असल्याने या केंद्रांवर रिक्षाचालकांची गर्दी असते.
अनेक वेळा वीजपुरवठा बंद झाला की रिक्षाचालकांना तेथेच बैठक मारावी लागते. गॅस संपला की गॅस टँकर येईपर्यंत थांबावे लागते. १६० रुपयांचा चार किलो सीएनजी भरण्यासाठी तीन ते चार दिवसांनी महापे येथे रिक्षाचालकांना धाव घ्यावी लागते. जाण्यामध्ये एक किलो गॅस संपतो. दुसऱ्या हद्दीत रिक्षा का आणली म्हणून शिळफाटा, दुर्गाडी फाटा येथे वाहतूक पोलीस या रिक्षाचालकांना अडवून दोनशे ते तीनशे रुपये दंडरूपाने वसूल करतात, असे काही रिक्षाचालकांनी सांगितले.
कोन, महापे येथे गॅस भरण्यासाठी गेल्यावर भूमिपुत्र रिक्षाचालक मध्येच घुसखोरी करून गॅस भरणा करून निघून जातात. त्यामुळे तासन्तास रांगेत उभे असलेले चालक बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काही करत नाहीत. कल्याणमधील बैलबाजार येथे सीएनजी पंप आहे. त्याला उच्च दाब नसल्याने रिक्षाचालक तिकडे फारसे फिरकत नाहीत, असे अनेक रिक्षाचालकांनी सांगितले. सीएनजीचा वापर खासगी वाहनांमध्येही करण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजीची मागणी वाढली आहे. कल्याण-डोंबिवली भागात ही केंद्रे सुरू करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी अनेक रिक्षाचालकांनी केली आहे. याबाबत रिक्षा संघटनेचे एक शिष्टमंडळ परिवहन मंत्र्यांना भेटणार आहे.
सीएनजीवरील रिक्षा वाढल्या आहेत. खासगी वाहने सीएनजीवर चालत आहेत. सीएनजीची मागणी वाढली आहे. त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका रिक्षाचालकांना बसत आहे. शासनाकडे सीएनजी पंप सुरू करण्यासाठी मागणी करण्यात आली आहे; पण त्याची दखल घेतली जात नाही. सीएनजीची वाढती गरज ओळखून कल्याण-डोंबिवली भागात तातडीने हे पंप सुरू करावेत, अशी माहिती रिक्षा संघटनेचे सचिव शेखर जोशी यांनी दिली. स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांनी रिक्षाचालकांच्या मेळाव्यात डोंबिवली पश्चिमेत सीएनजी केंद्र उभारण्यासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले आहे.
कल्याण-डोंबिवलीत रिक्षाचालक गॅसवर
कल्याण-डोंबिवली परिसरात ‘सीएनजी’ केंद्र नसल्याने रिक्षाचालकांना गॅस भरण्यासाठी नवी मुंबई किंवा भिवंडी येथे जावे लागते. या धकाधकीत रिक्षाचालकांना मोठा भरुदड पडत आहे. डोंबिवलीपासून ३५ किलोमीटर दूर गॅस भरण्यासाठी गेलेल्या रिक्षा शहरात वेळेत उपलब्ध होत नसल्याने संध्याकाळच्या वेळेत नागरिकांना घरी जाण्यासाठी रिक्षा मिळत नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-08-2014 at 06:59 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto rickshaw driver facing cng shortage in kalyan